सुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायाधीश आणि पद्मविभूषण पी एन भगवती यांचे गुरुवारी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. २००७ मध्ये केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

देशातील ख्यातनाम वकीलांमध्ये पी एन भगवती यांचा समावेश होता. प्रफुल्लचंद्र नटवरलाल भगवती असे त्यांचे पूर्ण नाव होते. जनहित याचिकांसाठी ते नेहमीच चर्चेत असायचे. भारतीय न्यायव्यवस्थेत जनहित याचिकेचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखले जाते. भगवती यांनी गुजरात हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम केले होते. यानंतर १९७३ मध्ये ते सुप्रीम कोर्टात न्यायाधीश म्हणून आले. १२ जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ या कालावधीत ते सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश म्हणून कार्यरत होते. गुरुवारी दिल्लीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. भगवती यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून भगवती आजारी होते.