माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्राचा तळ (बेस कँप) असलेल्या रेआसी जिल्ह्य़ातील कटरा गावानजीक दोन लष्करी गणवेश बेवारस अवस्थेत सापडल्यानंतर या भागातील सुरक्षा व्यवस्थेसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
नेहमीच्या गस्तीदरम्यान, कटराजवळ असलेल्या जम्मू जिल्ह्य़ातील झझ्झर कोटली भागात एका पुलाखाली दोन लष्करी गणवेश आणि जोडे बेवारस अवस्थेत सापडल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. यामुळे कटरा शहरात तसेच आजूबाजूच्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. तथापि, आतापर्यंत काही महत्त्वाचे असे काहीही आढळले नसून शहरातील परिस्थिती सामान्य आहे, असे तो म्हणाला. काहीही संशयास्पद गोष्ट आढळली नसली तरी संपूर्ण कटरा शहरात आम्ही सुरक्षा व्यवस्था ‘हाय अ‍ॅलर्ट’वर ठेवली आहे आणि शहरात येणाऱ्या वाहनांची प्रत्येक नाक्यावर कसून तपासणी करण्यात येत आहे, असे हा अधिकारी म्हणाला. लष्करी गणवेश या भागात बेवारस अवस्थेत कसे टाकून देण्यात आले याबाबतच्या सर्व पैलूंचा पोलीस शोध घेत आहेत.