दिल्ली- चंदिगड रेल्वेमार्गावर ताशी २०० किलोमीटर वेगाने गाडय़ा धावू शकण्याच्या दृष्टिकोनातून या मार्गाची सुधारणा करण्याच्या अभ्यासासाठी, तसेच अंबाला व लुधियाना रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी फ्रान्स भारताला सहकार्य करणार आहे.
भारतातील काही शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्यासाठीही फ्रान्स मदत करणार आहे. भारतीय आणि फ्रेंच रेल्वेमध्ये अर्ध-जलद वेगाच्या गाडय़ा आणि स्थानकांचा विकास यासाठीच्या सहकार्य करण्याच्या कराराच्या मसुद्यावर दोन्ही बाजूंनी स्वाक्षऱ्या केल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस ओलांद यांच्यात शुक्रवारी झालेल्या बोलण्यांमधून इतर मुद्दय़ांसोबत ही निष्पत्ती झाली.
रेल्वेबाबतच्या करारानुसार, दिल्ली- चंदीगड मार्गावर ताशी २०० किमी वेगाने गाडय़ा धावण्याच्या दृष्टीने त्याचा दर्जा सुधारण्याकरिता, तसेच पंजाबमधील अंबाला व लुधियाना स्थानकांचा पुनर्विकास करण्यासाठी भारतीय रेल्वे आणि फ्रेंच राष्ट्रीय रेल्वे संयुक्तपणे अर्थसाहाय्य करतील. सध्या या मार्गावरील सर्वात वेगवान गाडी असलेली चंदिगड- नवी दिल्ली दरम्यानची शताब्दी एक्सप्रेस आहे.
भारत सरकारने निश्चित केलेल्या यादीमधून काही शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास करण्याकरिता सहकार्य करण्यातही फ्रान्सने स्वारस्य दाखवले आहे. त्यानुसार, दोन्ही देशांनी ऑक्टोबर २०१२ मध्ये कायमस्वरूपी विकासाबाबत केलेल्या सामंजस्य करारातील तांत्रिक सहकार्यामध्ये स्मार्ट सिटीबाबतच्या सहकार्याचा समावेश करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे, असे  संयुक्त निवेदनात म्हटले आहे.