वाढत्या इंधनदरांमुळे एकीकडे सर्वसामान्य नागरिक चितेंत असताना सलग ११ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल ३३ पैशांनी वाढलं आहे. यासोबतच दिल्लीत पेट्रोलच्या दराने ९० चा आकडा गाठला असून लोकांनी प्रतिलीटरमागे ९० रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी ८० रुपये ६० पैसे मोजावे लागत आहेत.

तर मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलीटर ९६ रुपये ६२ पैसे आणि डिझेलचा दर ८७ रुपये ६७ पैसे इतका झाला आहे. कोलकातामध्ये पेट्रोलसाठी ९१ रुपये ४१ पैसे तर डिझेलसाठी ८४ रुपये १९ पैसे मोजावे लागत आहेत. बंगळुरुत हाच दर पेट्रोलसाठी ९३ रुपये २१ पैसे आणि डिझेलसाठी ८५ रुपये ४४ पैसे इतका आहे.

मुंबईत गुरुवारी पेट्रोलचा दर ९६ रुपये ३२ पैसे तर डिझेलचा दर ८७ रुपये ३२ पैसे इतका होता. विशेष म्हणजे राजस्थान आणि मध्य प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे.

मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि मालवाहतूक शुल्क यांनुसार इंधनाचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट राजस्थानमध्ये लागू केला जातो व त्यामागोमाग मध्य प्रदेशचा क्रमांक आहे. मध्य प्रदेशात पेट्रोलवर लिटरमागे ३३ टक्के अधिक ४.५ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार असून, डिझेलवर प्रति लिटर २३ टक्के अधिक ३ रुपये इतका कर आणि १ टक्का अधिभार लावला जातो.

इंधनाचे दर का वाढत आहेत?
पेट्रोलियम निर्यातक देशांची संघटना (ओपेक) आणि रशियासह त्यांचे सहयोगी देश मिळून होणारा ‘ओपेक प्लस’ हा गट यांच्यात झालेल्या करारानुसार सौदी अरेबियाने फेब्रुवारी व मार्च महिन्यात तेलाचे उत्पादन दररोज १ दशलक्ष बॅरेलने कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती सतत वाढत आहेत. यामुळे तेलाच्या किमती बॅरलमागे ६३ अमेरिकी डॉलपर्यंत चढल्या आहेत. यामुळेच इंधनाचे दर भडकले आहेत.