भारतातील महानगरांमध्ये वाहतूक स्थिती वाईट असून, तेथे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित  स्वयंचलित वाहतूक यंत्रणा उभारण्याची गरज आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून रस्ते व्यवस्थापन जास्त चांगल्या पद्धतीने करणे शक्य आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

त्यांनी आठवडाभराच्या अमेरिका भेटीत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वाहतूक व्यवस्थेवर न्यूयॉर्क शहरात भेट देऊन अधिकाऱ्यांची चर्चा केली. न्यूयॉर्क शहरात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा कार्यान्वित आहे. अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतूककोंडी कमी करणे, अपघात व्यवस्थापन असे विषय या वेळी चर्चेला आले होते. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद व बंगळुरू या महानगरांतील वाहतूक परिस्थिती वाईट आहे, त्यामुळे रस्ते व्यवस्थापन अधिक अचूक करण्यासाठी स्वयंचलित व आधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा राबवणे गरजेचे आहे, असे गडकरी यांनी सांगितले. पोलीस व रस्ते विभाग तसेच महापालिका यांनी समन्वयाने काम केले. वाहतूक व्यवस्थापन केवळ एका विभागाने करून भागणार नाही, त्यासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. भारतात दरवर्षी पाच लाख रस्ते अपघातात १ लाख ५० हजार लोक मरतात, जर स्वयंचलित प्रगत यंत्रणांचा वापर केला तर प्राणहानी कमी होईल असे त्यांनी सांगितले, रस्ते अपघात हे माझ्या खात्याचे अपयश आहे असे मी मानतो व त्यासाठीच रस्ता सुरक्षेला अग्रक्रम दिल्याचे त्यांनी सांगितले.