उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करुन फरार झालेला गँगस्टर विकास दुबे पोलीस चकमकीत ठार झाला आहे. ३ जुलै रोजी विकास दुबे आणि त्याच्या साथीदारांनी अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यामध्ये आठ पोलिसांचा मृत्यू झाला होता. यानंतर विकास दुबे फरार झाला होता. तेव्हापासून विकास दुबेचा शोध घेतला जात होता. तीन राज्यांचे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर गुरुवारी विकास दुबे पोलिसांच्या हाती लागला आणि त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या असून विकास दुबे ठार झाला.

नेमका घटनाक्रम कसा आहे –

– विकास दुबे मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरात गेला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. गुरुवारी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
– उत्तर प्रदेशांचं विशेष पोलीस पथक विकास दुबेला घेऊन कानपूरसाठी सकाळी निघालं होतं.
– यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला आणि गाडी पलटली
– गाडीचा अपघात झाल्यानंतर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला
– विकास दुबेने पोलिसांचं शस्त्र खेचून घेत गोळीबार करण्यास सुरुवात केली
– पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्या सांगितलं पण त्याने माघार घेतली नाही
– विकास दुबेने केलेल्या गोळीबारात विशेष पथकातील दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले
– पोलिसांच्या गोळीबारात विकास दुबे जखमी झाला असता त्याला रुग्णालयात नेण्यात आलं
– रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांना त्याला मृत घोषित केलं

३ जुलै रोजी उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेला अटक करण्यासाठी कानपूर येथे गेले असता त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला  होता. या गोळीबारात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून विकास दुबे फरार होता. पोलिसांनी तपासादरम्यान विकास दुबेच्या काही साथीदारांना ठार केलं होतं.