सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणाचे गूढ लवकरच उलगडण्याची शक्यता आहे. कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) म्हैसूरू येथील प्रा. के एस भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी चार जणांना अटक केली असून हे चौघेही एका हिंदूत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत. या चौघांचा कर्नाटकातील सामाजिक कार्यकर्त्या आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध असल्याचे सांगण्यात येते. दि. ५ सप्टेंबर २०१७ मध्ये गौरी लंकेश यांची त्यांच्या पश्चिम बंगळुरूतील घराबाहेर अज्ञात व्यक्तींनी हत्या केली होती.

हे चारही संशयित हे सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत. या सर्वांचे के टी नवीन कुमार (वय ३७) या हिंदू युवा सेनेच्या कार्यकर्त्याशी संबंध असल्याचा संशय एसआयटीला आहे. या सर्वांच्या पूर्वी अनेकवेळा बैठका झालेल्या आहेत. नवीन कुमारला गौरी लंकेश हत्येप्रकरणी मार्च २०१८ मध्ये अटक करण्यात आली आहे.

हिंदू जनजागृती समितीचा कार्यकर्ता अमोल काळे उर्फ भाईसाहेब (वय ३९, महाराष्ट्र), सनातन संस्थेचा कार्यकर्ता अमित देगवेकर उर्फ प्रदीप (वय ३९, गावा) कर्नाटकातील विजयपूर येथील मनोहर इडवे (वय २८), हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचा कार्यकर्ता सुजीत कुमार उर्फ प्रवीण (वय ३७, मंगळुरू) या चौघांना प्रा. भगवान यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सुरूवातीला सुजीत कुमारला अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला एक जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सुजीत कुमारकडे केलेल्या चौकशीनुसार एसआयटीने रात्रीतूनच कर्नाटक आणि महाराष्ट्रातील ८ ठिकाणी धाडी घातल्या. यात अनेक महत्वाचे धागेदोरे एसआयटीच्या हाती लागले आहेत.

देगवेकर हा सनातन संस्थेचा कार्यकर्ता मलगोंडा पाटील याच्याबरोबर राहत होता. वर्ष २००९ मध्ये मडगाव येथील स्फोटात मलगोंडा पाटलाचा मृत्यू झाला होता. बॉम्ब लावण्याचा प्रयत्न करताना असताना झालेल्या स्फोटात मलगोंडा मृत्यूमुखी पडला होता. मडगाव स्फोटाप्रकरणी गोवा पोलिसांनी देगवेकरला ताब्यात घेतले होते. पण चौकशी करून नंतर त्याला सोडून देण्यात आले होते. अमोल काळे हा पुणे येथे हिंदू जनजागृती समितीत काही वर्षांपूर्वी कार्यरत होता.