पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात एसआयटीकडून सुरु असलेल्या तपासात नवीन माहिती समोर आली आहे. सनातन आणि हिंदू जनजागृती समिती या हिंदुत्ववादी संघटनांशी गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे जोडले जात आहेत. या दोन संघटनांचा लंकेश यांच्या हत्येत थेट सहभाग असल्याचे पुरावे समोर आले नसले तरी अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे संकेत मिळत आहेत. ५ सप्टेंबर २०१७ रोजी गौरी लंकेश यांची त्यांच्या बंगळुरुतील घराबाहेर गोळया झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

गौरी लंकेश यांच्यावर गोळया झाडणाऱ्या परशूराम वाघामारे (२६) याला जुलै २०१७ मध्ये बंगळुरुला बोलावण्यात आले. या कटाचा मुख्य सूत्रधार अमोल काळेने (३७) त्याला बंगळुरुच्या हद्दीबाहेर एका दुर्मिळ घरामध्ये ठेवले होते. पुणे येथे राहणारा अमोल काळे हिंदू जनजागृती समितीची माजी संयोजक आहे.

वाघमारेला ज्या घरामध्ये ठेवण्यात आले होते ते घर सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या एका व्यक्तीने भाडयावर दिले होते. वाघमारे ज्या घरात थांबला होता ते घर लंकेश यांच्या बंगळुरुतील घरापासून २० किलोमीटर अंतरावर होते. वाघमारे आणि काळे यांनी या घराचा एक तळासारखा वापर केला.

हे घर सुरेश कुमार नावाच्या इमारत कंत्राटदाराने बायको आणि मुलांसाठी जून २०१७ मध्ये भाडयावर घेतले होते. पण १० जुलै २०१७ रोजी घरातील सदस्य बाहेर गेले त्यावेळी आरोपी त्या घरामध्ये वास्तव्याला होते अशी माहिती एसआयटीतील सूत्रांनी दिली. काळे आणि सुजीत कुमारच्या डायरीमध्ये या घराबद्दल माहिती मिळाली. हे दोघेही हिंदू जनजागृती समितीचे माजी सदस्य आहेत. काळे आणि सुजीत कुमारच्या मैत्रीखातर सुरेशने ते घर काळेला राहण्यासाठी दिले होते. सुरेशची आरोपींबरोबर सनातन संस्थेंच्या माध्यमातून ओळख झाली होती.