जर्मनीची आर्थिक राजधानी फ्रॅंकफर्ट शहरात दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील शक्तिशाली बॉम्ब सापडला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हा बॉम्ब शहराच्या मुख्य भागात सापडला आहे. शक्तिशाली बॉम्ब असल्यानं खबरदारी म्हणून ६० हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे वृत्त ‘सीएनएन’ने दिले आहे.

फ्रॅंकफर्ट येथे गेल्या आठवड्यात एका इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू होते. त्यावेळी हा शक्तिशाली बॉम्ब सापडला. शहरातील ‘श्रीमंतांची वस्ती’ असलेला हा परिसर निर्मनुष्य करून बॉम्ब निकामी करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी घेतला. त्या काळातील बॉम्ब हे अनियंत्रित ऊर्जा उत्सर्जन करणाऱ्या पद्धतीचे असल्याने अधिक खबरदारी घेण्यात आली. हा बॉम्ब निकामी करताना काही अपघात होऊन तो फुटला असता तर मोठी वित्त आणि जीवितहानी होईल, अशी भीती होती. त्यामुळे खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला. त्यानंतर हा बॉम्ब निकामी करण्यात आला. पण संपूर्ण परिसर निर्मनुष्य करण्यासाठी जवळपास एक आठवडा लागला. दीड किलोमीटर परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यात दोन मोठ्या रुग्णालयांतील रुग्ण आणि लहान मुलांचीही संख्या अधिक होती.

जर्मनीत महायुद्धात वापरलेल्या स्फोटकांपैकी दोन हजार टन स्फोटके दरवर्षी सापडतात, असे सांगितले जाते. दरम्यान, निकामी करण्यात आलेला बॉम्ब ‘एचसी ४०००’ या प्रकारातील होता. ब्रिटीश सैन्याने जर्मनीवर केलेल्या हवाई हल्ल्यादरम्यान फ्रॅंकफर्ट शहरावर हा बॉम्ब टाकल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ब्रिटीश आणि अमेरिकन हवाई दलांनी महायुद्धाच्या काळात जर्मनीवर हल्ला करण्यासाठी सुमारे १.५ मिलियन टन वजनाची स्फोटके वापरली होती. या हल्ल्यात सहा लाख जणांचा मृत्यू झाला होता. तर जर्मनीवर टाकलेल्या बॉम्बपैकी १५ टक्के बॉम्बचा स्फोट झालाच नाही. ते आजही जमिनीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळेच खोदकामांवेळी अनेकदा अशा प्रकारचे बॉम्ब येथे सापडतात. २०१० साली ४५० किलोचा बॉम्ब सापडला होता. तो निकामी करताना तीन पोलीस ठार झाले होते.