उत्तर प्रदेशातील औरेया जिल्ह्यात कैफियत एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरले. आझमगडवरून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनला झालेल्या या अपघातात ७४ प्रवासी जखमी झाले. या अपघातात एकाही प्रवाशाचा जीव गेला नाही आणि याचे श्रेय अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या डब्यांना दिले जात आहे. कैफियत एक्स्प्रेसला जर्मन तंत्रज्ञान असलेले डबे होते.

कैफियत एक्स्प्रेसला झालेला अपघात हा उत्तर प्रदेशमध्ये गेल्या पाच दिवसांत झालेला दुसरा मोठा रेल्वे अपघात होता. मात्र अपघातग्रस्त ट्रेनचे डबे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित लिंक-हॉफमॅन बुश (एलएचबी) प्रकारचे डबे असल्याने या अपघातात कोणतीच जिवीतहानी झाली नाही. तसेच कोणालाही गंभीर जखम झाली नाही. एलएचबी तंत्रज्ञानामुळे अपघातानंतर ट्रेनचे डबे उलटत नाहीत. तसेच ते एकमेकांना धडकतही नाहीत. या डब्यांचा बाहेरील भाग स्टेनलेस स्टीलने बनवलेला असतो तर आतील भाग अॅल्यूमिनियमने तयार केलेला असतो. अशाप्रकारे एकच जड धातू वापरण्याऐवजी एक जड आणि दुसरा तुलनेने हलका धातू वापरल्याने पारंपारिक डब्यांपेक्षा हे डबे जास्त हलके आणि सुरक्षित असतात. बांधणीमधील वैशिष्ट्याबरोबरच प्रत्येक डब्याला असलेल्या एलिव्हेटेड न्यूमॅटिक डिस्क ब्रेक्समुळे वेगाने जाणारी ट्रेन थांबवणे सहज शक्य होते.

भारतीय रेल्वेमध्ये गेल्या १७ वर्षांपासून या एलएचबी डब्यांचा वापर केला जातो. या एका डब्याची किंमत दीड ते दोन कोटी रुपये इतकी आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी यावर्षीच सर्व ट्रेन्सला अशाप्रकारचे डब्बे असतील अशी घोषणा केली आहे. सध्या राजधानी एक्सप्रेस, शताब्दी, दुरांतो, अंत्योद्य, हमसफर आणि गतिमान एक्स्प्रेससारख्या लांब पल्ल्यांच्या ट्रेन्समध्ये अशा एकूण ७५ डब्यांचा वापर भारतीय रेल्वे करत आहे.

कैफियत एक्सप्रेसला झालेल्या अपघाताच्या चार दिवसआधीच मुजफ्फरनगर येथील खतौलीजवळ उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघातामध्ये २३ जण मृत्यूमुखी पडले होते. या गाडीतील डब्बे जुन्या पद्धतीचे असल्याने जिवीतहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे समजते.