उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचा बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी एका टॅक्सी चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ३२ वर्षीय टॅक्सी चालकाने २ ऑगस्ट रोजी खोडा येथे लहान मुलीवर बलात्कार करुन तिचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीवर बलात्कार करताना तो नशेच्या धुंदीत होता आणि त्याने पॉर्न फिल्म बघून झाल्यावर हे कृत्य केल्याची माहिती आता समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत मुलीच्या वडिलांच्या मालकीच्या घरात आरोपी दिपक ठाकूर हा मागील एक वर्षापासून भाडेकरू म्हणून राहत होता. २ ऑगस्टच्या रात्री ही मुलगी त्याच्या घरी गेली तेव्हा तो दारुच्या नशेत पॉर्न फिल्म बघत होता. मुलगी घरात शिरली त्यावेळेस त्याने तिला पकडून तिच्यावर बलात्कार केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने मदतीसाठी आरडाओरड सुरु केली तेव्हा तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर त्याच रात्री दिपकने मृतदेह प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बांधून शेजारीच राहणाऱ्या त्या मुलीच्या काकांच्या घरावर फेकून दिला.

गाझियाबादचे पोलिस अधीक्षक वैभव क्रिश्ना यांनी या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती दिली. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. आपल्यावर संक्षय येऊ नये म्हणून आरोपी मुलीच्या कुटुंबाबरोबर पोलिस स्थानकामध्ये तक्रार नोंदवण्यासाठीही आला होता. २ ऑगस्ट रोजी सकाळीच दिपक मणीपुरी येथे राहणाऱ्या त्याच्या सासरच्या मंडळीना भेटून घरी आला होता. त्यानंतर त्याने घराची साफसफाई करुन संध्याकाळी मद्यपान केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना दिलेल्या कबुलीजबाबामध्ये दिपकने त्या रात्री नक्की काय घडले याची माहिती दिली. त्या रात्री मी मद्यपान केले होते. मी एकटाच घरात असल्यामुळे ही मुलगी घरात येण्याआच्या अर्धातास आधीपासून पॉर्न फिल्म बघत होतो. अचानक ही मुलगी माझ्या घरात आली. त्यावेळीही मी माझ्या फोनवर पॉर्न फिल्मच बघत होतो. चाळीस मिनिटांपेक्षा अधिक काळ मी फोनवर पॉर्न पाहत होतो. अशातच नशा केल्याने नशेच्या धुंदीतच मी त्या मुलीला पकडले. घराच्या दरवाजाची कडी लावली. घरातील लाईट्स बंद केले आणि त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा बलात्कार केला. ज्यावेळी ती ओरडू लागली तेव्हा मी तिचे तोंड आणि नाक दाबून धरले. म्हणूनच गुदमरुन तिचा मृत्यू झाल्याचे दिपकने पोलिसांना सांगितले.

घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर दिपक घाबरला. आपल्या हातून घडलेली हत्या लपवण्याच्या उद्देशाने त्याने त्या मुलीचा मृतदेह प्लॅस्टीकच्या बॅगेत भरून घराजवळच्या शिड्यांवर ठेवला. रात्री साडेअकराच्या सुमारास मुलीच्या वडिलांनी माझ्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे सांगत कडी लावून घेण्यास सांगितले. त्यानंतर मला घराबाहेर आरडाओरड आणि रडण्याचे आवाज येऊ लागले. त्यामुळे मी बाहेर गेलो आणि मुलीच्या नातेवाईकांबरोबर अगदी पोलिस स्टेशनवमध्येही तक्रार नोंदवण्यासाठी गेलो. मात्र त्याआधी मी मृतदेह असणारी प्लॅस्टीकची बॅग शिड्यांवरून माझ्या घरा शेजारी राहणाऱ्या मुलीच्या काकांच्या घरावर ठेवल्याचेही दिपकने सांगितले.

तक्रार करुन आल्यानंतर ३ ऑगस्ट रोजी दिपक रोजसारखा आपली टॅक्सी चालवत होता. मात्र ४ ऑगस्ट रोजी या प्रकरणात आपले नाव समोर आल्याचे समजताच दिपक भुवनेश्वरमधील आपल्या मित्राच्या घरी गेला. मात्र अशाप्रकारे तो अचानक तिकडे का गेला याची माहिती त्याने घरच्यांना तसेच त्या मित्रालाही दिली नाही. मात्र सहा तारखेला गाझियाबाद पोलिसांनी भुनेश्वरमधून दिपकला अटक केली. दिपकला अपहरण, बलात्कार आणि खून प्रकरणात अटक करुन आली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.