सी एनएन वृत्तवाहिनीनं सोमवारी न्यूयॉर्कमधल्या महत्त्वाच्या बागा, मॉल्स अशा ठिकाणी एक लक्षणीय प्रयोग केला. सीएनएनचे वार्ताहर, कॅमेरामन कोणाच्याही समोर उभे राहायचे आणि दोन छायाचित्रं त्यांना दाखवायचे. विचारायचे, यांना आपण पाहिलेलं आहे का?

आश्चर्याची बाब म्हणजे सर्वच्या सर्व प्रश्नांना ‘नाही’ अशीच उत्तरे आली. ज्यांची छायाचित्रं दाखवली गेली त्या कोणी साध्यासुध्या व्यक्ती नव्हत्या आणि ज्या दिवशी ही छायाचित्रं दाखवली गेली तो दिवसही साधासुधा नव्हता. कारण बुधवारी हे दोघेही उपाध्यक्षपदाच्या वादफेरीत सहभागी होणार आहेत. पण तरीही टिम केन किंवा माईक पेन्स यांच्यापकी एकालाही न्यूयॉर्कमधले अनेक जण ओळखू शकले नाहीत. मुळात ही माणसंच कोण आहेत हे माहीत नसल्यानं ते कोणत्या राज्यांचे गव्हर्नर आहेत, ही बाब माहीत असणं दूरच राहिलं. दोन तरुणांनी जरा बरं उत्तर दिलं. पैकी एक म्हणाला, या माणसांची नावं माहीत नाहीत.. ते कोणत्या तरी राज्यांचे गव्हर्नर आहेत.. कोणती राज्यं ते त्याला माहीत नव्हतं.

हा मजकूर वाचला जाईपर्यंत उपाध्यक्षीय उमेदवारांची वादफेरी पार पडली असेल. या वादफेरीच्या दीड दिवस आधीपर्यंत या दोन व्यक्ती लोकांना माहीत नसाव्यात यातून जनसामान्यांच्या सामान्य ज्ञानाची पातळी दिसते की या दोघांचं एकूण असून नसल्यासारखं असणं?

या दोघांबाबत दोन्हीही मुद्दे लागू पडतात. टिम केन हे व्हर्जिनिंया राज्याचे गव्हर्नर आहेत तर माईक पेन्स हे इंडियानाचे. टिम केन हे हिलरी क्लिंटन यांचे उपाध्यक्षपदाचे साथीदार, तर माईक पेन्स हे डोनाल्ड ट्रम्प यांचे.

केन यांना निवडून हिलरी यांनी मोठी खेळी खेळली असं इथं मानलं जातं. याचं कारण पेन यांचं राज्य. ते व्हर्जिनिया या दोलायमान राज्याचे प्रमुख आहेत. वॉशिंग्टन हे राजधानीचं शहर व्हर्जिनिया राज्यात येतं. हे राज्य ना डेमोक्रॅटिक मानलं जातं ना रिपब्लिकन. या राज्याला अध्यक्षीय निवडणुकीत १३ मतं आहेत. २००८ साली ओबामा यांनी या राज्यात मोठी आघाडी घेतली होती. २०१२ सालीही हे राज्य ओबामा यांच्या बाजूनं उभं राहिलं. त्यामुळेही असेल पण हिलरी यांनी या राज्याच्या प्रमुखाला आपला उपाध्यक्षपदाचा साथीदार निवडण्याचा निर्णय घेतला. टिम केन वकील आहेत. स्थलांतरितांचे, मानवाधिकारांचे खटले ते लढतात. त्यामुळे स्थलांतरितांत त्यांची मोठी ऊठबस आहे. खेरीज, स्पॅनिश भाषेवर त्यांचं मोठं प्रभुत्व आहे. या राज्यातली हिस्पॅनिक्स नावानं ओळखली जाणाऱ्यांची वस्ती पाहिली तर हा मोठाच फायद्याचा मुद्दा ठरतो. हे राज्य आपल्या मागे उभं राहील याची इतकी खात्री हिलरी यांना आहे की त्या अजूनपर्यंत एकदाही या राज्यात आलेल्या नाहीत. पण या राज्याचं महत्त्व असं की उमेदवारी मिळाल्यापासून ट्रम्प या राज्यात आले नाहीत असा एकही आठवडा गेलेला नाही. हिलरी यांचा केन यांच्यावर पूर्ण विश्वास आहे.

या तुलनेत पेन्स हे वेगळे आहेत. त्यांच्या अध्यक्षीय उमेदवाराच्या, म्हणजे ट्रम्प यांच्या तुलनेत तर ते दुसरं टोक म्हणायला हवेत. हळू बोलतात, सभ्यासारखे वागतात, स्वभावानं ऋजू आहेत आणि मुख्य म्हणजे आताची त्यांची पत्नी ही पहिलीच पत्नी आहे. तब्बल ३१ वर्षांचा अभंग संसार आहे त्यांचा. ही बाब मोठीच कौतुकास्पद मानायला हवी. ट्रम्प यांचा स्वत:च्या उत्स्फूर्ततेवर फारच विश्वास आहे. भाषणाची तयारी वगरे काहीही ते करत नाहीत. पेन्स यांचं तसं नाही. गेला आठवडाभर ते वादफेरीची तालीम करतायत. एरवी भाषणांतही समोर त्यांच्या मुद्दय़ांचा चिटोरा ठेवलेला असतो. हे असं करण्यात त्यांना काहीही कमीपणा वाटत नाही. पण ट्रम्प यांना मात्र हे असले मार्ग मंजूर नसतात. आणखी एका बाबतीत मी ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळा आहे, असं ते सांगतात. ते म्हणजे उत्पन्न. ट्रम्प यांच्या तुलनेत माझी शून्यं बरीच कमी आहेत, असं ते जाहीर म्हणतात. केन यांच्या व्हर्जिनिया राज्यापेक्षा पेन्स यांच्या इंडियानाला दोन मतं कमी आहेत. ११ मतं या राज्यातनं अध्यक्षपदासाठी मिळवावी लागतात.

आज, बुधवारी होणारी उपाध्यक्षीय चच्रेची वादफेरी ही एकमेव. म्हणजे अध्यक्षीय वादफेऱ्यांप्रमाणे उपाध्यक्षांना जाहीर भूमिका मांडायची संधी तीन वेळा मिळत नाही. त्यामुळे हे दोघेही उमेदवार आजच्या चच्रेत आपापल्या अध्यक्षीय उमेदवारांचं घोडं किती पुढे दामटतात ते पाहण्यासारखं असेल. पहिल्या अध्यक्षीय वादफेरीनंतर हिलरी यांना चार ते पाच टक्क्यांची आघाडी आहे, असं जनमताचा कौल सांगतो. या आघाडीवर उपाध्यक्षांच्या चच्रेचा निर्णायक परिणाम होणार नसला तरी या चच्रेतील उमेदवाराच्या कामगिरीचा अध्यक्षीय उमेदवारांना फायदा होतोच होतो.

तेव्हा या एका दिवशी का असेना हे दोन्ही उपाध्यक्षीय उमेदवार आपापल्या अध्यक्षपदाच्या उमेदवारांना बाजूला सारून चच्रेत मध्यवर्ती भूमिका बजावतील. एरवी हिलरी आणि ट्रम्प यांनी सारी चर्चा स्वत:भोवतीच केंद्रित ठेवली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे या दोन उमेदवारांचे चेहरेसुद्धा अनेकांना माहीत नाहीत. २००८ सालच्या निवडणुकांत या पदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे सारा पालिन या उमेदवार होत्या. वेगळ्या अर्थाने त्यांनी ती निवडणूक गाजवली. बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञानाच्या बाबतीत त्यांची तुलना हिंदी चित्रपटातली समाजमाध्यमांतून अधिक गाजणारी नवनायिका आलिया भट हिच्याशीच होऊ शकेल. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत असताना एकदा पालिन यांनी रशियाची सीमा ही माझ्या अलास्काला लागून असल्याचं विधान करून अमेरिकी मुत्सद्दय़ांचे डोळे पांढरे केले होते. रशियाचा उल्लेख त्यांनी शेजारील राष्ट्र असा केला होता. त्या तुलनेत यंदाचे उपाध्यक्षपदाचे दोन्ही उमेदवार पुरेसे गंभीर आणि पोक्त आहेत.

वास्तविक हे पद अगदीच दुर्लक्ष करावं असं नाही. याआधी डिक चेनी, अल गोर, थोरले जॉर्ज बुश, जेराल्ड फोर्ड, लिंडन जॉन्सन, रिचर्ड निक्सन, हॅरी ट्रमन अशा अनेकांनी हे पद भूषवलेलं आहे. डिक चेनी, जो बायडन किंवा अल गोर यांच्यासारखे काही सोडले तर अनेक उपाध्यक्ष पुढे अध्यक्षपदीही निवडले गेले आहेत. म्हणजे कोणाही सोम्यागोम्याला उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं केलं जातं असं नाही.

पण तरी यंदा हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार बिचारे झाकोळलेच गेलेत. तेव्हा, आपण यांना पाहिलंत का, असं विचारायची वेळ यावी हे काही चांगलं लक्षण नाही. अध्यक्षीय उमेदवारांसाठीही आणि मतदारांसाठीही..

girish.kuber@expressindia.com

@girishkuber