डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या वक्तव्यांमुळे अमेरिकेत पुन्हा एकदा चारित्र्य आणि क्षमता या विषयाला तोंड फुटलंय. यातला विरोधाभासी मुद्दा म्हणजे हा चारित्र्याचा प्रश्न उपस्थित करणारे डोनाल्ड ट्रम्प ही काही कोणी षड्रिपूंवर विजय मिळवलेली व्यक्ती आहे असं नाही..

व्य क्तीचं लैंगिक चारित्र्य आणि त्याची बुद्धिमत्ता, कर्तृत्व यांचा काही अन्योन्य संबंध असतो का? एखाद्या व्यक्तीची कर्तबगारी मोजताना त्याच्या ‘या’ उद्योगांना किती महत्त्व द्यायचं?

अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकांच्या निमित्तानं हा प्रश्न सध्या पुन्हा चर्चिला जातोय. त्यामागचं कारण म्हणजे या महासत्तेच्या प्रमुखपदाचं स्वप्न पाहणारे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांचे पती बिल क्लिंटन यांच्या चारित्र्याला घातलेला हात. आणि तरीही बिल क्लिंटन हेच निवडणूक प्रचारातली सर्वात लोकप्रिय व्यक्ती असणं.

ट्रम्प यांनी निवडणुकीच्या या टप्प्यावर प्रचार एकदम चार-पाच पायऱ्यांनी खाली आणलाय. हिलरी यांचे पती बिल ही किती हीन दर्जाची व्यक्ती आहे, हे सांगायला त्यांनी सुरुवात केलीये. ते हीन का? त्यांच्या बुद्धिमत्तेबाबत संशय घ्यायला जागा आहे म्हणून ते हीन, की त्यांना अध्यक्षीय जबाबदाऱ्यांचं आकलन नव्हतं म्हणून ते हीन? ट्रम्प यांच्या मते श्री. क्लिंटन हे हीन, कारण त्यांचे अनेक महिलांशी आलेले संबंध. हिलरी यांनी जगातल्या सगळ्यात बाहेरख्याली व्यक्तीशी विवाह केला, असं ट्रम्प याचं म्हणणं आहे.

त्यानंतर अमेरिकेत पुन्हा एकदा चारित्र्य आणि क्षमता या विषयाला तोंड फुटलंय. यातला विरोधाभासी मुद्दा म्हणजे हा चारित्र्याचा प्रश्न उपस्थित करणारे डोनाल्ड ट्रम्प ही काही कोणी षड्रिपूंवर विजय मिळवलेली व्यक्ती आहे असं नाही. पण तरीही ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी यांना घायाळ करण्यासाठी हा मुद्दा काढला. त्यांच्या या कृतीनं अनेक प्रश्नांना अनौरस जन्म दिलाय. आपल्याकडे या असल्या मुद्दय़ांचं फारच औत्सुक्य. त्यामुळे त्यांची दखल घ्यावी लागेल.

यातला पहिला मुद्दा म्हणजे निवडणुकीतील महिला उमेदवाराच्या पतीनं काही उद्योग केले असतील तर त्यासाठी त्याच्या पत्नीला कोणत्या न्यायानं जबाबदार धरायचं? बरं ते उद्योग असेही नाहीत की, भ्रष्ट मार्गानी माया जमवलीये आणि तिचा फायदा पत्नीनंही घेतलाय. तेव्हा श्री. क्लिंटन यांच्या खासगी उद्योगांच्या नैतिकानैतिकतेवर सौ. क्लिंटन यांची क्षमता कशी जोखणार? आणि समजा मामला उलटा असता तर? म्हणजे श्रींच्या जागी सौ. नको त्या उद्योगातल्या असत्या तर हा प्रश्न इतरांचा चर्चाविषय होऊ शकतो का? ट्रम्प यांच्याबाबत हा प्रश्न येतो. कारण त्यांची विद्यमान पत्नी एकेकाळी फक्त प्रौढांसाठीच्या प्रकाशनांसाठी पैसे मोजून स्वदेहदर्शन घडवे. त्या वेळी तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय होता, असं म्हणून तो मुद्दा सोडून देण्याचा समंजसपणा या समाजानं दाखवलेला असताना याच समाजात श्री. क्लिंटन यांच्यावरच्या आरोपांनी सौ. क्लिंटन यांना घायाळ करण्याच्या प्रयत्नांचं समर्थन करता येईल का?

परत यातली महत्त्वाची बाब अशी की खुद्द क्लिंटन वा हिलरी क्लिंटन यांनी ही बाब कधीही नाकारलेली नाही. तेव्हा क्लिंटन यांनी काय केलं याबद्दल त्यांच्या पत्नीचा काही आक्षेप नसेल तर इतरांना त्याबाबत नाक खुपसण्याचा अधिकार आहे का? आणि समजा क्लिंटन यांनी चुका केल्या, हे मान्य केलं तरी ‘ते’ क्षेत्र वगळता क्लिंटन यांच्या बुद्धिमत्तेचं काय करायचं? या संदर्भात दोन दाखले महत्त्वाचे ठरतात.

यातला पहिला बराक ओबामा यांच्या उमेदवारीबाबत. सन २०१२च्या निवडणुकीत मित रॉम्नी यांच्या विरोधात ओबामा यांची परिस्थिती अवघड होती. रॉम्नी कैकपटीनं ओबामा यांच्या पुढे होते. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. त्याआधी त्या ओबामा सरकारमध्ये हिलरी क्लिंटन मंत्री होत्या. वास्तविक डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवण्यात त्या ओबामा यांच्या कडव्या प्रतिस्पर्धी. पुढे सन २०१२ मध्ये निवडणूक जड जातेय असं लक्षात आल्यावर ओबामा यांनी बिल क्लिंटन यांना साकडं घातलं. त्या वर्षी ५ सप्टेंबरला झालेल्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या अधिवेशनात बिल क्लिंटन यांनी भाषण केलं आणि निवडणुकीचं तागडं ओबामा यांच्याकडे झुकू लागलं. प्रचंड व्यासंग, जागतिक राजकारणाचं भान आणि त्याचे स्थानिक संदर्भ, मोजकी शब्दकळा, कुठेही उगाच भावनेला हात घालण्याचा नाटकीपणा नाही अशा गुणवैशिष्टय़ांचं त्याचं भाषण हे अजूनही राजकीय अभ्यासकांच्या चर्चेचा विषय आहे. यूटय़ूबसारख्या माध्यमातून अजूनही ते पाहिलं/ऐकलं जातं, इतकं ते लोकप्रिय आहे.

दुसरा प्रसंग या वर्षीचा. या वेळी पत्नी हिलरी हिच्या समर्थनार्थ आयोजित सभेत विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासकट सर्व जण बोलले, पण प्रचंड प्रतिसाद घेतला तो बिल यांनी. अनेकांना.. खरं तर अनेकींना.. असं म्हणणं हे हिलरी यांच्यासाठी अपमानास्पद आहे, असं वाटेल. पण इथं सगळेच जण.. यात महिलाही आल्या.. हिलरींना मिळणाऱ्या पाठिंब्यात बिल क्लिंटन यांचा वाटा मोठा आहे, असं मानतात. खरं तर हिलरी क्लिंटन यांच्या मागे लोक नाहीत. कारण त्यांचा स्वभाव. बऱ्याचशा अलिप्त आणि काहीशा तुसडय़ा अशा हिलरी यांच्यात राजकीय नेत्याला जी एक माणसं जोडायची हातोटी लागते ती नाही. त्यामुळे जनसंपर्क नाही. तेव्हा त्यांच्यासाठी जनसंपर्काचा चुंबक म्हणजे नवरा बिल.

ही बाब प्रतिस्पर्धी ट्रम्प यांनाही जाणवत असावी. कारण ट्रम्प यांच्याकडे लोकप्रियता असेल. पण काहीही बरळणाऱ्याला काही काळ का असेना, जनतेचा पाठिंबा मिळतो तसं त्यांचं आहे. खुद्द त्यांचे निकटवर्तीयदेखील ट्रम्प यांना विद्वान वगैरे सोडा, पण बुद्धिमानदेखील मानणार नाहीत. केवळ आंतरिक प्रेरणा हेच त्यांचं बळ. ती शास्त्रकाटय़ाच्या कसोटय़ांवर तपासून घ्यायची इच्छा नाही आणि क्षमता तर नाहीच नाही. गेल्या आठवडय़ात झालेल्या पहिल्या अध्यक्षीय वादफेरीत त्याचमुळे ते उघडे पडले. अशा प्रसंगी सामान्य बुद्धीची कोणतीही व्यक्ती करते तीच गोष्ट ट्रम्प यांनी केली.

ती म्हणजे क्लिंटन यांच्या चारित्र्याला हात घातला. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी ट्रम्प यांच्या भूतकाळाचा धांडोळा घेतला. ‘प्लेबॉय’च्या मुखपृष्ठीय ललनांना मोटारीत बसवून त्यांनी काय काय केलं, याच्या चर्चाही आता रंगल्यात. त्यात अध्यक्ष होऊ पाहणाऱ्या या गृहस्थानं काल पहाटे तीन वाजता एका सौंदर्यस्पर्धेत विजयी झालेल्या तरुणीसंदर्भात काही ट्वीट केलं. या तरुणीला ‘ढब्बी’ असं जाहीर संबोधून ट्रम्प यांनी तिला दुखावलं होतं. ती आता हिलरी क्लिंटन यांच्यासाठी काम करते. ट्रम्प यांचा महिलाविषयक दृष्टिकोन कसा आहे, हे दाखवायला हिलरी यांनी हे उदाहरण पहिल्या वादफेरीत दिल्यानं ट्रम्प रागावले. त्यामुळे त्यांनी या तरुणीच्या चारित्र्याचा उद्धार करणारे ट्वीट्स अशा अडनिडय़ा वेळेला केले. आता इतक्या सर्वोच्चपदी बसू पाहणाऱ्यांनी ट्विटिंग वगैरेत रस घ्यावा का़  आणि शिवाय अशा वेळी?

ऐन निवडणुकांच्या तोंडावर या सगळ्या शिळ्या.. पण तरीही सदाबहार.. कढीला ऊत आणला जात असल्यानं या संदर्भात हिलरी क्लिंटन यांना विचारणा होणं साहजिकच होतं.. ‘ट्रम्प तुमच्या नवऱ्याच्या चारित्र्याविषयी आरोप करतायत, तुमचं काय मत आहे.’ कोणतीही कसंनुसं झाल्याची भावना व्यक्त न करता, जणू काही प्रश्न दुसऱ्याच कोणाविषयी आहे असं दाखवत हिलरी क्लिंटन म्हणाल्या, ‘ट्रम्प काहीही बोलतात हे आता सिद्ध झालंय.. तेव्हा त्यांच्या प्रत्येक आरोपावर मी प्रतिक्रिया व्यक्त करायलाच हवी, असं थोडंच आहे?’ हाच प्रश्न बिल क्लिंटन यांनाही चर्चेत थेट विचारला गेला. तुमचं चाळीस वर्षांचं वैवाहिक आयुष्य आणि ही प्रकरणं.. त्यावर क्लिंटन म्हणाले, ‘हा प्रवास छानच झालाय. मार्गात काही दु:खद, कटू प्रसंग आलेही,’ असं म्हणून त्यांनी अर्नेस्ट हेमिंग्वे या विख्यात लेखकाच्या अजरामर ओळी उद्धृत केल्या.. ‘आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकावर मोडून पडायची वेळ येते. पण त्यातलेच काही त्या मोडलेल्या तुकडय़ावरही पुन्हा ताठ मानेने उभे राहू शकतात.. हिलरी अशी आहे. मन उदास करणाऱ्या घटनांना पचवून उभं राहण्याची तिच्यात क्षमता आहे. स्वत:च्या वरदानांइतकीच ती शापदेखील साजरी करू शकते’.

तेव्हा आता प्रश्न तीन : यात व्यक्ती म्हणून ट्रम्प, हिलरी आणि बिल यांचं कसं मूल्यमापन करायचं? आणि ते कोण करणार? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याची गरज असते का?

 

– गिरीश कुबेर

girish.kuber@expressindia.com

Twitter @girishkuber