गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आधी गर्जना करणारे वाघ होते आता त्यांचे मांजर झाले आहे अशी टीका गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ज्या पक्षांशी त्यांनी हातमिळवणी केली आहे त्यात खुर्ची टिकवण्यासाठी त्यांना जो संघर्ष करावा लागतो आहे त्यावरून तरी असे दिसते आहे की एकेकाळी गर्जना करणारा वाघ आता मांजरासारखा शांत बसू लागला आहे.

एखाद्याच्या हातचे कळसुत्री बाहुले जसे स्वतःच्या डोक्याने वागत नाही तशी मनोहर पर्रिकर यांची सध्याची अवस्था आहे. गोव्यात भाजपासोबत हातमिळवणी करणाऱ्या पक्षांच्या अवाजवी मागण्या पूर्ण करण्यात त्यांचा वेळ निघून जातो आहे. गोवाच्या राजकारणात मनोहर पर्रिकर बोलायचे तो शब्दा वाघाच्या गर्जनेप्रमाणे असायचा आता त्या वाघाचे मांजर झाले आहे. गोवा फॉरवर्ड सारख्या पक्षांच्या हातचे ते बाहुले झाले आहेत असेही चोडणकर यांनी म्हटले आहे. गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी तर मासे माफियांचा बचाव करण्याचाही प्रयत्न केला अशीही टीका त्यांनी केली.

मनोहर पर्रिकरांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची प्रिय आहे. त्यामुळे त्यांची अवस्था धृतराष्ट्रासारखी झाली आहे. ते आता सत्ता टिकवण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. खरेतर नुकतेच ते कर्करोगाचे उपचार घेऊन आले आहेत. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे. अशा अवस्थेत त्यांना आराम करण्याची आवश्यकता आहे. मी त्यांना या संदर्भातला सल्ला खूप आधीच दिला होता. तुम्ही मुख्यमंत्रीपदी आहात तुम्हाला अशा आजारात ताण तणाव सहन होणार नाहीत असे मी त्यांना सांगितले होते. मात्र त्यानंतर मला भाजपा नेत्यांच्या धमक्या येऊ लागल्या असाही आरोप चोडणकर यांनी केला.