रविवारी रात्री गोव्याच्या बेनॉलिम बीचवर दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळे गोव्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद गोवा विधानसभेत देखील उमटले आहेत. या प्रकरणावरून गोवा विधानसभेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद आता निर्माण झाला आहे. “जेव्हा १४ वर्षांच्या अल्पवयीन मुली रात्रभर बीचवर राहतात, तेव्हा पालकांनी त्यावर आत्मपरीक्षण करायला हवं. या मुली रात्रभर बाहेर का होत्या?” अशी विचारणाच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पालकांना केली आहे. त्यांच्या या विधानावरून विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससोबतच सर्वसामान्य गोवेकरांकडून देखील तीव्र आक्षेप घेतला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जबाबदारी सरकारवर टाकता येणार नाही!”

या मुद्द्यावरून गोवा विधानसभेत गदारोळ सुरु असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकारची भूमिका मांडताना हे विधान केलं आहे. “जेव्हा १४ वर्षांची मुलं रात्रभर बीचवर राहतात, तेव्हा पालकांनीच आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. फक्त मुलं ऐकत नाहीत म्हणून आपण त्याची जबाबदारी सरकार आणि पोलिसांवर टाकू शकत नाही”, असं प्रमोद सावंत म्हणाले आहेत.

“मुलांची सुरक्षितता पालकांची जबाबदारी”

दरम्यान, मुलांची जबाबदारी ही पालकांची जबाबदारी आहे, अशी देखील भूमिका प्रमोद सावंत यांनी मांडली आहे. “आपल्या मुलांची सुरक्षितता ही पालकांची जबाबदारी आहे” असं म्हणतानाच पालकांनी आपल्या मुलांना, विशेषत: अल्पवयीन मुलांना रात्री बाहेर पडू देऊ नये, असे सूतोवाच देखील प्रमोद सावंत यांनी केले. विशेष म्हणजे, प्रमोद सावंत यांच्याकडेच राज्याच्या गृहमंत्रीपदाची सूत्रं आहेत.

विरोधकांची आगपाखड

खुद्द मुख्यमंत्र्यांनीच अशा प्रकारची भूमिका घेतल्यामुळे विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. “राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. रात्री बाहेर फिरताना आम्ही भिती का बाळगावी? खरंतर गुन्हेगारांना जेलमध्ये टाकायला हवं आणि कायद्याचं पालन करणाऱ्या नागरिकांना बाहेर मोकळेपणाने फिरता यायला हवं”, अशी भूमिका गोव्याचे काँग्रेस प्रवक्ते अॅल्टन डिकोस्टा यांनी मांडली आहे. तर, “नागरिकांची सुरक्षा ही पोलीस आणि राज्य सरकारची जबाबदारी आहे. जर ते ही सुरक्षा पुरवू शकत नाहीत, तर मुख्यमंत्र्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही”, अशा शब्दांत गोवा फॉरवर्ड पार्टीचे आमदार विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे.

नेमकं घडलं काय?

रविवारी अर्थात २५ जुलै रोजी गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. ४ जणांनी या मुलींवर बलात्कार केला. तसेच, त्यांच्यासोबत असणाऱ्या मित्रांना धमकावले. पोलीस असल्याचं सांगून या चौघांनी आधी त्यांच्यावर आरडा-ओरडा केला. त्यानंतर दोघा मुलींवर बलात्कार केला. यापैकी एक जण गोव्याच्या कृषी विभागात ड्रायव्हर म्हणून काम करतो. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात यश आल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Goa cm pramod sawant controversial statement on minor gangrape benaulim beach pmw
First published on: 29-07-2021 at 13:57 IST