‘स्पेसएक्स’चे संस्थापक इलन मस्क यांची भीती

वॉशिंग्टन : अपॉफिस या ‘गॉड ऑफ केऑस’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या लघुग्रहाची धडक पृथ्वीला १३ एप्रिल २०२९ रोजी बसण्याची शक्यता असून त्यात पृथ्वीचे मोठे नुकसान होऊ  शकते, अशी भीती अब्जाधीश तंत्रज्ञ उद्योजक व ‘टेस्ला’ तसेच ‘स्पेसएक्स’चे संस्थापक इलन मस्क यांनी व्यक्त केली आहे.

हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता असून आता त्याला तोंड देण्याची तयारी करण्यासाठी केवळ दहा वर्षे हातात आहेत, असे सांगून ते म्हणाले, ३४० मीटरचा हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता ४५ हजारांत एक आहे. तो पृथ्वीला धक्का देऊन जाण्याची शक्यता आहे कारण त्या वेळी हा लघुग्रह पृथ्वीच्या तीस हजार किलोमीटर जवळ येणार आहे. मानवी इतिहासात पृथ्वीवर आदळलेल्या लघुग्रहापैकी तो सर्वात घातक ठरू शकतो. सध्या तरी त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्याकडे कुठलीच यंत्रणा नाही.

या संभाव्य आघाताबाबत त्यांनी भीती व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे, धोका आहे पण बचाव नाही ही सध्याची स्थिती आहे. अमेरिकेच्या नासा या संस्थेने या लघुग्रहाचा अभ्यास सुरू केला असून तो लघुग्रह धोक्याचा असल्याचे त्यातून मान्य केले आहे, असे असले तरी या लघुग्रहापासून बचाव करण्यासाठी नेमकी कशी यंत्रणा असावी हे अजून नासालाही निश्चित करता आलेले नाही. त्याचा मुकाबला करण्यासाठी या वर्षी नासाने ‘दी डबल अ‍ॅस्टरॉइड रिडायरेक्शन टेस्ट’ ही योजना जाहीर केली होती.

गुरुत्वाकर्षणाचा परिणाम शक्य

पृथ्वीचाही परिणाम या लघुग्रहावर होऊ शकतो. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे त्याची कक्षा बदलू शकते त्यामुळे त्याची दिशा बदलू शकते असे मत काही नासा वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. गुरुत्वीय बलामुळे अपॉफिसचा पृष्ठभाग बदलून त्याचे तुकडे उडू शकतात. ५-१० मीटरचे लघुग्रह नेहमीच पृथ्वीजवळून जात असतात पण अपॉफिससारखा महाकाय लघुग्रह पृथ्वीजवळून जाण्याची घटना दुर्मीळ आहे.