देवकणाची (गॉड पार्टिकल किंवा हिग्ज बोसॉन कण) शक्यता वर्तवणारा सिद्धांत मांडणारे ब्रिटनचे पीटर हिग्ज व बेल्जियमचे फ्रँकाइस एंगलर्ट यांना यंदा भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक सैद्धांतिक संशोधनासाठी जाहीर करण्यात आले आहे. खरेतर या कणाविषयीच्या संशोधनात रॉबर्ट ब्राऊट, भारताचे सत्येंद्रनाथ बोस यांच्यासह अलीकडच्या काळातील युवा वैज्ञानिकांचा वाटा असतानाही ते द्यायचे तर कुणाला द्यायचे असा वाद होता. परंतु ही संकल्पना पहिल्यांदा मांडणाऱ्या व जिवंत असलेल्या दोन वैज्ञानिकांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नोबेल पारितोषिक मरणोत्तर देता येत नाही असा नियम आहे. त्यामुळे ब्राउट आणि बोस यांची नावे बाद झाली.
दैवी कण
दैवी कणाची संकल्पना १९६४ साली मांडण्यात आली तर त्याचे अस्तित्व प्रयोगा अंती १४ मार्च २०१३ रोजी सिद्ध झाले. योगायोगाची बाब म्हणजे विश्वनिर्मितीमागील गूढ उकलण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईन्स्टाईन यांचा १४ मार्च हा जन्मदिवस. दैवी कणाची संकल्पना मांडणाऱ्यांमध्ये सत्येंद्रनाथ बोस आणि पीटर हिग्ज यांचे मुख्य योगदान असल्याने या कणास ‘हिग्ज बोसॉन’ हे नाव देण्यात आले. सममितीय पद्धतीने कणांच्या हालचाली होत असताना कणांनी वस्तुमान विरहित होण्याची गरज असते. मात्र असे होण्याऐवजी त्यांना वस्तुमान प्राप्त होते. दैवी कणांची संकल्पना यामागील कारण स्पष्ट करते.
अणू, त्याचे उपकण आणि वस्तुमान
पदार्थाचा मूलभूत घटक म्हणून आजवर अणूंकडे पाहिले गेले. मात्र या अणूचेही विभाजन होऊ शकते आणि त्याचेही उपकण असतात असे शास्त्रज्ञांच्या लक्षांत आले. या उपकणांनाही स्वतचे वस्तुमान असते. आणि हे वस्तुमान हिग्ज बोसॉन कणामुळे प्राप्त होते, असा पीटर हिग्ज यांचा सिद्धांत आहे. एका महास्फोटातून (बिग बँग) विश्वाची उत्पत्ती झाली, पण या स्फोटानंतर थंड झालेल्या द्रव्यास वस्तुमान कसे मिळाले असावे यावर साठच्या दशकात संशोधन सुरू होते. ह्गिज यांनी हे वस्तुमान ‘दैवी कणां’मुळे मिळाल्याचा दावा केला होता.
दैवी कणाचे अस्तित्व सिद्ध करणारा प्रयोग
बोसॉन कण शोधण्यासाठी तीन वर्षे सर्नच्या एलएचसी म्हणजे लार्ज हॅड्रॉन कोलायडर या यंत्रात प्रोटॉनच्या शलाकांची टक्कर घडवून आणून प्रयत्न केले. गेल्या वर्षी चार जुलैला वैज्ञानिकांनी अतिशय आनंदाच्या वातावरणात दैवी कण सापडल्याची घोषणा केली होती. पण त्यात एक मूलकण सापडला असून तो हिग्ज बोसॉन असावा असे सावधपणे म्हटले होते.
स्टॉकहोम येथे १० डिसेंबरला आल्फ्रेड नोबेल यांच्या पुण्यतिथीला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात येईल. या दोन वैज्ञानिकांना ८० लाख स्वीडिश क्रोन म्हणजे १.२५ दशलक्ष डॉलर विभागून मिळणार आहेत. त्यांच्या सैद्धांतिक संशोधनावर एलएचसीमधील प्रयोगामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.