देशाच्या विकासाशी जीडीपीचा काहीही संबंध नाही, असं वक्तव्य भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत केल्यानंतर सरकारवर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेसनेही दुबे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री आणि सध्या तिहार तुरूंगात असलेल्या पी. चिंदमबरम यांनी दुबे यांच्यावर टीका केली आहे. देवानेच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावं असं चिंदबरम यांनी म्हटल आहे.

जीडीपी आणि अर्थव्यवस्थेविषयी बोलताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीचा फार उपयोग होणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम म्हणाले, “जीडीपीचे आकडे विसंगत आहेत. वैयक्तिक कर कपात होणार आहे. आयात शुल्क वाढणार आहे. देवानंच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावं,” अशी मार्मिक टीका चिंदबरम यांनी केली आहे. चिंदबरम यांच्याबरोबरच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही दुबे यांच्या निर्णयावर ट्विट करून टोला लगावला आहे. “देवा आम्हाला नव्या भारतातील अशा नवशिक्या अर्थशास्त्रज्ञांपासून आम्हाला वाचव,” असं सुरजेवालांनी म्हटलं आहे.

सरकारने शुक्रवारी संध्याकाळी दुसऱ्या तिमाहीतील आकडे जाहीर केले होते. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही विकास दराला गती मिळू शकलेली नाही. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घट झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत विकास दर घटून ४.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षात विकास दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर ५ टक्के होता.

काय म्हणाले होते निशिकांत दुबे?

संसदेमध्ये सोमवारी जीडीपीच्या मुद्यावर चर्चा झाली. यावेळी लोकसभेतील भाजपाचे खासदार निशिकांत दुबे म्हणाले, “जीडीपी १९३४ साली आला. त्याआधी जीडीपी वैगेर काही नव्हता. फक्त जीडीपीला बायबल, रामायण किंवा महाभारत मानून काहीही साध्य होणार नाही. भविष्यात जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही.”

“आजच्या नव्या थिअरीनुसार सर्वसामान्य माणसाचा दीर्घकालीन आर्थिक विकास होतोय की, नाही ते महत्वाचे आहे. दीर्घकालीन विकासाबरोबर लोक आनंदी आहेत की, नाही ते जीडीपीपेक्षा जास्त महत्वाचे आहे ” असे निशिकांत दुबे संसदेत आपल्या भाषणात म्हणाले होते.