सरकारकडे पैशाची कमी नाही पण  सरकारमध्ये काम करणाऱ्यांच्या मानसिकतेची अडचण आहे. या वर्षात सरकारला विकासाच्या दृष्टीने मोठ्या योजना राबवायच्या आहेत. मात्र, सरकारकसोबत काम करणाऱ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीकोनाचा अभाव आहे, असे मत केंद्रीय रस्ते, वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथील विश्वेश्यरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या मंत्रालयाने पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ५ लाख कोटी रुपये खर्च करण्याची योजना बनवली आहे.

गडकरी म्हणाले, मी तुम्हाला सत्य सांगतो. सरकारकडे पैशाची कमी नाही तर सरकारसोबत काम करणाऱ्या लोकांमध्ये नकारात्मक मानसिकता ठासून भरली आहे. कोणतेही निर्णय घेण्याची धमक त्यांच्यात नाही. नुकतेच मी एका उच्चस्तरीय बैठकीला गेलो होते तिथे ते (आयएएस अधिकारी) म्हणाले की, आम्ही अमुक सुरु करु, तमुक सुरु करू. तेव्हा मी त्यांना म्हटलं, तुम्ही काय सुरु करणार? जर तुमच्याकडे काहीही सुरु करण्याचे अधिकार आहेत तर तु्म्ही आयएएस अधिकारी का झालात आणि इथे काम का करता आहात?

दरम्यान, गडकरी नुकतेच म्हणाले होते की भारताला सन २०२४ पर्यंत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणे अवघड आहे पण अशक्य नाही. आपल्या देशाकडे पुष्कळ साधनसंपत्ती आणि उत्पादन क्षमता आहे. मात्र, तरीही आपण दरवर्षी करोडो रुपयांची औषधे, वैद्यकीय उपकरणं, कोळसा, तांबे, कागद आदी गोष्टी आयात करतो. जर आपल्याला ५ ट्रिलिअन डॉलर अर्थव्यवस्था व्हायची असेल तर देशी उत्पादनात वाढ करुन आयात कमी केली पाहिजे.