15 December 2017

News Flash

मेंदूज्वराशी लढा हेच खरं आव्हान! योगींकडून गोरखपूर दुर्घटनेच्या मुद्द्याला बगल

अक्षम्य निष्काळजीपणाच्या मुद्द्याला बगल देत सर्व खापर मेंदूज्वराच्या समस्येवरच फोडले

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली | Updated: August 12, 2017 7:13 PM

Yogi Adityanath : बीआरडी हॉस्पिटलमध्ये ३६ मुलांचा झालेला मृत्यू हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेला नाही असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकारने दिले आहे.

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रुग्णालयात शुक्रवारी ऑक्सिजन पुरवठ्याअभावी ६३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर देशभरातून उत्तर प्रदेश सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली होती. मात्र, यानंतर एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अक्षम्य निष्काळजीपणाच्या मुद्द्याला बगल देत सर्व खापर मेंदूज्वराच्या समस्येवरच फोडले. इतक्या मोठ्या दुर्घटनेनंतर योगी आदित्यनाथ नेमकी काय भूमिका मांडणार, याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र, कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच त्यांनी मेंदूज्वराचे लावलेले लांबण शेवटपर्यंत सुरू ठेवले. उत्तर प्रदेशात १९७८ पासून मेंदूज्वराची समस्या आहे. येथील लहान मुलांच्या अकाली मृत्यूला कोण जबाबदार असेल तर, ती अस्वच्छता आहे, उघड्यावर मलविसर्जन करण्याची सवय आहे. मेंदूज्वर एक मोठे संकट आहे. आपल्यासाठी हे खूप मोठे आव्हान असून आपल्याला त्यावर मात करायची आहे. मात्र, त्यासाठी सरकारला दोष देऊन चालणार नाही. सरकार ही कधीच समस्या असून शकत नाही. जर सरकार स्वत: समस्या असेलच तर या व्यवस्थेलाच काही अर्थ नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत ६३ जण दगावले आहेत. आज, शनिवारी एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारनं या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, ऑक्सिजन पुरवठा खंडित करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी केलेल्या पत्रव्यवहाराची माहिती समोर आली आहे. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुष्पा सेल्स या कंपनीने याबाबत पत्रव्यवहार करून थकीत बिलाची माहिती दिली होती. कंपनीचे एकूण ६८,५८,५९६ रुपये रुग्णालयाकडे थकले आहेत. थकीत बिल चुकवले नाही तर कंपनीकडून केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा खंडित करण्यात येईल, असा इशाराही कंपनीने पत्राद्वारे दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील बीआरडी हॉस्पिटलमध्ये ३६ मुलांचा झालेला मृत्यू हा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झालेला नाही असे स्पष्टीकरण उत्तर प्रदेश सरकारने दिले आहे. काही तासांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा नक्कीच खंडित झाला होता, परंतु हे काही मृत्यूचे कारण नाही अशा शब्दात उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.

First Published on August 12, 2017 7:13 pm

Web Title: government is not the problem yogi adityanath besides gorakhpur tragedy