पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रवासी भारतीय दिनानिमित्त वाराणसी येथे सरकार लवकरच चिप असलेले ई-पासपोर्ट जारी करणार असल्याची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय नागरी विमानचालन संस्थेकडून परवानगी मिळाल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने ई-पासपोर्ट जारी करण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिकमध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस (ISP), येथे हे पासपोर्ट बनवले जातील. ISP ला यासाठी केंद्राकडून मंजुरी मिळाली आहे. आयएसपी, आयआयटी कानपूर आणि राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (एनआयसी) या प्रणालीवर संयुक्तपणे काम करत आहे. यासाठी आयआयटी कानपूर आणि एनआयसीने एकत्र येत एक सॉफ्टवेअर बनवलं आहे.

काय आहे ई-पासपोर्ट –
अद्ययावत सुरक्षा प्रणाली असलेल्या ई-पासपोर्टवर अर्जदाराची डिजीटल स्वाक्षरी असेल आणि ते चिपमध्ये सेव्ह केलं जाईल. जर कोणी व्यक्ती चिपसोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं पासपोर्ट निष्क्रीय होईल. याशिवाय चिपमध्ये सेव्ह केलेली माहिती फिजीकल पासपोर्टशिवाय वाचता येणार नाही.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास पासपोर्ट सेवा प्रकल्पाद्वारे जागतिक स्तरावर सर्व दूतावासांशी जोडले जाणार आहेत. सर्व भारतीयांच्या सेवेसाठी पासपोर्ट सेवेशी संबधित एक केंद्रीकृत प्रणाली तयार केली जाणार आहे. त्यामध्ये एक पाऊल पुढे जाऊन चिप आधारित ई-पासपोर्टसाठी काम केले जाणार आहे.

ई-पासपोर्टची वैशिष्ट्य –
1. ई-पासपोर्टच्या पुढील आणि मागील बाजूचं आवरण जाड असेल.
2. मागील आवरणावर छोटी सिलीकॉन चिप असेल. ही चिप पोस्ट स्टॅम्पपेक्षाही छोटी असेल.
3. चिपमधील माहिती वाचण्यासाठी केवळ काही सेकंदाचा वेळ लागेल. यामुळे इमिग्रेशन काउंटर्सवर वेळ वाचेल.
5. 64 किलोबाइट इतकी या चिपची मेमरी असेल. यामध्ये 30 व्हिजीट केलेल्या अथवा आंतरराष्ट्रीय प्रवासाची माहिती सेव्ह होईल.
6. चिपमध्ये फोटो आणि बोटांचे ठसे देखील सेव्ह केले जातील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
7. अमेरिकेच्या सरकारी प्रयोगशाळेत याची सर्वप्रथम चाचणी घेण्यात आली आहे.