मागील आठवड्यात पार पडलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा निकाल १५ मे रोजी लागला. या निवडणुकांमध्ये १०४ जागांवर मुसंडी मारत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र हा आकडा बहुमताच्या जवळ जाणारा नाही. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसने निकालाच्या दिवशी युती करत सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांची भेट घेतली. मात्र राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी पहिले आमंत्रण भाजपाला दिले आहे. राज्यपाल कोणाला बोलावणार हे पाहणे महत्त्वाचे होते. कर्नाटकच्या राज्यपालांनी मात्र भाजपाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्याचे ट्विट आमदार सुरेश कुमार यांनी केले आहे. कर्नाटकच्या राजकीय नाट्यात ही बातमी अनेक घडामोडींना वेग देणारी ठरली आहे.

एवढेच नाही तर भाजपाने गुरुवारी सकाळी येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे असेही ट्विट केले होते. मात्र हे ट्विट काही काळाने डिलिट करण्यात आले अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. गुरुवारी सकाळी ९.३० वाजता येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे ट्विट भाजपाने केले होते. मात्र काही वेळातच ते डिलिट करण्यात आले.

२२४ जागांपैकी २२२ जागांसाठी मतदान झाले आणि त्याचा निकालही १५ मे रोजी लागला. बहुमतासाठीची मॅजिक फिगर ११३ आहे. भाजपाने १०४ जागा जिंकल्या, तर काँग्रेसने ७८ आणि जनता दल सेक्युलरने ३७ जागा जिंकल्या. या दोन्ही पक्षांनी हात मिळवणी करत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत. अशात आता राज्यपाल काय करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. राज्यपाल सुरुवातीला भाजपालाच बोलावणार याची चर्चा रंगली होतीच. आता आमदार सुरेश कुमार यांच्या दाव्यानुसार राज्यपालांनी पहिले आमंत्रण भाजपालाच दिले आहे.

काँग्रेस आणि जेडीएसकडे एकत्रित रित्या ११५ जागा आहेत. पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा जेडीएस नेते कुमारस्वामी यांनी केला होता. सत्तास्थापनेची संधी देण्याची मागणी केल्यानंतर राज्यपालांनी कुमारस्वामींना कायदेशीर मार्गाने तोडगा काढण्याची हमी दिली होती. जेडीएसच्या विधीमंडळ नेतेपदी एच.डी. कुमारस्वामी यांची निवड करण्यात आली आहे. आता आमदार सुरेश कुमार यांच्या दाव्यानुसार भाजपाला सत्तास्थापनेसाठी संधी देण्यात आली आहे. गुरुवारी नेमके काय घडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.