करोना व्हायरसमुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांवर ‘डेक्सामेथासोन’ हे औषध वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या उपचारपद्धतीमध्ये काही बदल केले आहेत. मेथाइलप्रेड्निसोलोनला पर्याय म्हणून डेक्सामेथासोन औषध वापरायला परवानगी दिली आहे. करोनाची मध्यम आणि गंभीर लक्षणे असलेल्या तसेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांवर डेक्सामेथासोन औषधाने उपचार करायला परवानगी देण्यात आली आहे.

सर्वप्रथम यूकेमधील संशोधनात डेक्सामेथासोन औषध करोनावर प्रभावी ठरत असल्याचे समोर आले. डेक्सामेथासोन हे औषध प्रामुख्याने संधीवात, अ‍ॅलर्जी, दमा आणि काही प्रकारच्या कॅन्सरमध्ये उपचारासाठी वापरले जाते. हे औषध करोनावर सुद्धा प्रभावी ठरत आहे. डेक्सामेथासोन हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे. करोनामुळे गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांना हे औषध देण्यात यावे, असा WHO ने सल्ला दिला होता.

डेक्सामेथासोनचा डोस कमी प्रमाणात देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. या औषधामुळे मृत्यू दर कमी होत आहे. करोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्वाचं म्हणजे हे औषध स्वस्तात उपब्ध होतं.

काय म्हणाले WHO चे महासंचालक
“सध्या डेक्सामेथासोन औषधासंबंधी प्राथमिक माहिती उपलब्ध आहे. हे औषध करोना रुग्णांना लागू पडतेय, ही दिलासा देणारी बाब आहे. आता वेगाने या औषधाचे उत्पादन वाढवून जगभरात वितरण करणे आवश्यक आहे. खासकरुन ज्या भागांमध्ये जास्त गरज आहे, तिथे हे औषध पोहोचवण्याची गरज आहे” असे टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस म्हणाले. ते जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत.