केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं भारतात येणाऱ्या परदेशी प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. ८ ऑगस्टपासून हे नियम लागू होणार आहेत. या नियमांनुसार, सर्व प्रवाशांना निश्चित प्रवासापूर्वी कमीत कमी ७२ तास आधी https://newdelhiairport.in या वेबसाईटवर जाऊन प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे.

या नव्या नियमावलीत म्हटलं की, प्रवाशांना पोर्टलवर एक प्रतिज्ञापत्र द्याव लागणार आहे ज्यामध्ये त्यांना १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीचं पालन करावं लागेल. यामध्ये सात दिवसांचं संस्थात्मक क्वारंटाइन असेल यासाठी त्यांना स्वतःच खर्च करावा लागेल. त्यानंतर सात दिवसांचं होम क्वारंटाइन असेल. तर गर्भवती महिला, कुटुंबातील कोणाचा मृत्यू झाल्यास, गंभीर आजार किंवा १० वर्षापेक्षा कमी वय असलेली मुलं असतील तर अशा परिस्थितीत १४ दिवसांसाठी क्वारंटाइनची परवानगी दिली जाऊ शकते. त्यासाठी वेबसाईटवरच आधी माहिती द्यावी लागेल.

नियमावलीत म्हटलंय की, प्रवाशांनी निगेटिव्ह आलेला आरटी-पीसीआर चाचणीचा अहवाल सादर केल्यास त्यांना संस्थात्मक क्वारंटाइनपासून दिलासा मिळू शकतो. मात्र, हा चाचणी अहवाल प्रवासाच्या ९६ तासांपेक्षा जास्त जुना असता कामा नये. त्याचा अहवाल पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे. जर या अहवालात फेरफार करण्यात आला असेल तर कारवाईला सामोरं जावं लागेल.