भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन बुधवारी  जीसॅट-७ ए या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. नियोजित वेळेनुसार संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी GSLV-F11 रॉकेट जीसॅट-७ ए उपग्रहाला घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावला. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे. भारतीय हवाई दलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. कारण जीसॅट-७ ए या दळणवळण उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे नेटवर्क परस्परांशी जोडणे शक्य होईल. जीसॅट – ७ ए हा लष्कराचा ३९ वा दळणवळण उपग्रह आहे.

हवाई दलाचे तळ जोडण्या इतकेच जीसॅट-७ ए चे कार्य मर्यादीत नाही तर हवाई दलाच्या ड्रोन मोहिमांमध्येही मोठा फायदा होणार आहे. सध्याचे हवाई दलाचे जमिनीवरील जे नियंत्रण कक्ष आहेत ते उपग्रह केंद्रीत नियंत्रण कक्षामध्ये बदलले जातील. जीसॅट-७ ए मुळे मानवरहित ड्रोन विमानांचा पल्ला, टिकण्याची क्षमता आणि लवचिकता मोठया प्रमाणात वाढणार आहे.

भारताची अमेरिकेकडून प्रीडेटर-बी आणि सी गार्डीयन ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु असताना जीसॅट-७ ए उपग्रहाचे प्रक्षेपण होत आहे. प्रीडेटर-बी आणि सी गार्डीयन ड्रोन ही उंचावरुन आणि दिर्घकाळ उड्डाण करण्याची क्षमता असलेली उपग्रह नियंत्रित मानवरहित ड्रोन विमाने आहेत. दूर अंतरावरुन शत्रूच्या तळाला अचूक लक्ष्य करण्याची या ड्रोन विमानांची क्षमता आहे. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने याच ड्रोन विमानांच्या मदतीने अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला आहे.

या दळणवळण उपग्रहाचा खर्च ५०० ते ८०० कोटी रुपये आहे. या उपग्रहाच्या चार सौर पॅनलमध्ये ३.३ किलोवॅट इलेक्ट्रीक पावर निर्माण करण्याची क्षमता आहे. जीसॅट ७ ए आधी इस्त्रोने जीसॅट ७ ज्याला रुक्मिणी म्हटले जाते तो उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केला आहे. खास नौदलासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे. जीसॅट ७ च्या मदतीने नौदलाला २ हजार सागरी मैल क्षेत्रावर लक्ष ठेवता येते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया आणि लढाऊ विमाने कुठे आहेत त्याची माहिती मिळते.