गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ‘पाटीदार अनामत आंदोलन समिती’च्या वाढत्या जवळिकीवर भाजपने निशाणा साधला आहे. पटेल आरक्षणाबद्दलचा काँग्रेसचा प्रस्ताव मान्य असल्याचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी म्हटले होते. यावर भाजपने ‘एका मूर्खाने प्रस्ताव दिला आणि दुसऱ्या मूर्खाने तो स्वीकारला,’ अशा शब्दांमध्ये टीका केली आहे. हार्दिक पटेल आणि काँग्रेस यांच्याकडून पटेल समाजाला आरक्षणाच्या नावावरुन मूर्ख बनवले जात असल्याची टीका गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी केली.

आज (बुधवारी) दुपारी पत्रकार परिषद घेऊन हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षणाबद्दल काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती दिली. काँग्रेसने आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून ते सत्तेवर आले, तर त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. काँग्रेसने पटेल आरक्षणाची प्रमुख मागणी मान्य केली आहे. विधानसभेत बिगर-आरक्षित समुदायासाठी विधेयक सादर केले जाईल, असे काँग्रेसकडून सांगण्यात आल्याचे हार्दिक पटेल यांनी सांगितले. काँग्रेसला पाठिंबा देण्याचे थेट सांगणार नाही, पण भाजपला आमचा विरोध असेल, असे म्हणत हार्दिक पटेल यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

हार्दिक पटेल यांच्या पत्रकार परिषदेनंतर थोड्याच वेळात भाजपकडून उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हार्दिक पटेल आणि काँग्रेस यांच्यावर हल्लाबोल केला. ‘पाटीदार समाजासमोर हार्दिकचा बुरखा फाटला आहे. त्याचा खरा चेहरा समोर आला आहे. हार्दिक आता काँग्रेससोबत मतांची सौदेबाजी करत आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी समाजाचे तुकडे करण्याचे काम त्यांच्याकडून सुरु आहे,’ अशा शब्दांमध्ये पटेल यांनी हार्दिक पटेल यांच्यावर तोंडसुख घेतले.

हार्दिक पटेल यांच्याकडून समाजात फूट पाडण्याचे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप नितीन पटेल यांनी केला. ‘हार्दिक स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी समाजातील विविध जातींमध्ये संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ‘पाटीदार समाजाने हार्दिक आणि काँग्रेसकडून दाखवल्या जाणाऱ्या प्रलोभनांपासून दूर रहावे,’ असे आवाहनदेखील त्यांनी केले. ‘संविधानातील तरतुदींप्रमाणे ५० टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देणे अशक्य आहे, हे हार्दिक पटेल यांना माहित आहे. मात्र तरीही हार्दिक काँग्रेसकडून देण्यात आलेली स्क्रिप्ट वाचत आहे,’ असेही पटेल म्हणाले.