गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या (शुक्रवार) होत आहे. अशातच भाजपच्या एका उमेदवाराने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका जाहीर सभेत बोलताना दाभोईचे भाजपचे उमेदवार शैलेश मेहता यांनी जे लोक ‘दाढी’ आणि ‘टोपी’चे समर्थन करतात त्यांनी आपला आवाज वाढवू नये. त्यांना भिती निर्माण व्हावी म्हणून मी आलो आहे, असा दमच मेहता यांनी दिला. मेहता यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मेहता म्हणाले, सभेत कोणी दाढीधारी व्यक्ती असेल तर मी त्यांची माफी मागतो. पण या गोष्टी कमी झाल्या पाहिजे. मला अनेकांनी गर्दीच्या ठिकाणी असे वक्तव्य करू नये अशा सूचना केल्या आहेत. पण मी केवळ १० टक्के लोकांमुळे मौन का बाळगू? ते जे काही काम करत आहेत, त्यांना ते बंद करावेच लागेल.

एका तडीपार व्यक्तीला भाजप उमेदवाराची भीती वाटते, असे बुधवारी शांतता समितीच्या बैठकीत एकाने सांगितले. हे लोक घाबरावे यासाठीच मी इथे आलो आहे. मी घाबरण्यासाठी नव्हे घाबरावयला आलो आहे. तडीपार आणि समाजकंटकांना घाबरण्याची गरज आहे. त्यांच्यात डोळेवर करण्याची हिंमत आली नाही पाहिजे. त्यांनी जर असे केले तर याची किंमत त्यांना चुकवावी लागेल. दरम्यान, गुजरातमध्ये ९ आणि १४ डिसेंबरला दोन टप्प्यात निवडणूक होणार असून १८ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.