गुजरातच्या भरूच परिसरातल्या पटेल वेलफेअर रुग्णालयाला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. पटेल वेलफेअर रुग्णालयातच करोना रुग्णांसाठी कोविड सेंटर देखील बनवण्यात आलं होतं. आग लागण्याची घटना घडली, तेव्हा रुग्णालयात करोना रुग्ण देखील होते. मात्र, आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

 

“ही फक्त आमच्यासाठीच नाही तर संपूर्ण भरूचसाठी दुर्दैवी घटना आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या मदतीने आम्ही रुग्णांना इतर रुग्णालयात हलवलं आहे. पण या दुर्घटनेमध्ये १४ रुग्ण आणि २ नर्सचा मृत्यू झाला आहे”, अशी माहिती भरूचमधील या रुग्णालयाचे ट्रस्टी झुबेर पटेल यांनी दिली आहे.

 

दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. “भरूच रुग्णालयात जीव गमावलेल्या रुग्णांप्रती मी शोक व्यक्त करतो. राज्य सरकार या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर करत आहे”, अशी घोषणा विजय रुपाणी यांनी केली आहे.

 

गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णालयांमध्ये आगी लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. नुकतीच ठाण्याजवळच्या मुंब्रा येथील शिमला पार्क भागातील प्राइम क्रिटिकेअर या बिगर करोना रुग्णालयामध्ये बुधवारी पहाटे आग लागून झालेल्या दुर्घटनेत चार रुग्ण दगावले. रुग्णालयातील विद्युत मीटर रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णांना बाहेर काढताना गुदमरून चौघांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. त्याआधी देखील विरार येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीमध्ये १५ करोनाबाधितांचा होरपळून मृत्यू झाला होता.