गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयावर नेत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या प्रतिक्रियेत मोदींच्या नेतृत्वाचे हे यश असल्याचे म्हटले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे अभिनंदन करतो. या विजयामुळे मोदींचे नेतृत्वच योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे. देशाच्या आर्थिक क्षेत्रातील विकासासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाला हा पाठिंबा आहे. हा विजय खूप महत्वाचा आहे. काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून गुजरातच्या विकासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले हेाते. या विकासाच्या मॉडेलवर शंका उपस्थित करणाऱ्या काँग्रेस आणि विरोधकांना हा मोठा धडा असल्याचा टोला त्यांनी लगावला.

गुजरात निवडणुकीत योगी आदित्यनाथ हे स्टार प्रचारक होते. त्यांनी वेळोवेळी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले, मोदींच्या नेतृत्वाखाली देश जगासमोर आर्थिक महासत्ता म्हणून समोर येत आहेत. गुजरातच्या विजयावर लोकांनी शंका उपस्थित केली होती. मला वाटते ते सर्व आता पुन्हा एकदा मोदींचे नेतृत्व मान्य करतील.

गुजरातचा विजय अनेक दृष्टया महत्वाचा आहे. विशेषत: काँग्रेस आणि विरोधी पक्षातील लोकांनी गुजरातच्या विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले. ज्या गुजरातच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण देश आणि जगाने अंमलात आणले. त्या गुजरातच्या विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले. शिष्टाचार विसरून असभ्य भाषेचा वापर करण्यात आला. भाजपचा हा विजय म्हणजे काँग्रेस आणि मित्रपक्षांसाठी धडा आहे, असे त्यांनी ठणकावले.

गुजरातमध्ये भाजपचा हा पाचवा विजय ठरला असून मोदींप्रती हा एक जनादेश असल्याचे मानले जाते, असेही ते म्हणाले.