अमेरिकेत यूएस कपिटॉल इमारतीत घुसलेल्या एका सशस्त्र व्यक्तीला पोलिसांनी गोळीबारात जखमी करून ताब्यात घेतले. पर्यटनाचा मोसम सुरू असताना ही सशस्त्र व्यक्ती घुसल्याने घबराट निर्माण झाली. पोलिसांनी लॅरी रसेल डॉसन (वय ६६) याला यूएस कॅपिटॉल व्हिजिटर सेंटरच्या प्रवेशद्वारातून आत घुसताना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी डॉसन याच्यावर गोळीबार केला तेव्हा बाजूने जाणारी एक महिलाही त्यात जखमी झाली. डॉसन व त्या महिलेला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. डॉसन याची स्थिती नेमकी काय आहे हे सांगण्यात आलेले नाही. या गोळीबाराच्या घटनेमुळे यूएस कॅपिटॉल ही संसदेची इमारत बंद करण्यात आली आहे, कारण सध्या सिनेट व प्रतिनिधिगृहाला सुटी आहे. काही काळ यूएस कॅपिटॉल येथे घबराट पसरली. पोलिसांनी कर्मचाऱ्यांना आहे तेथेच थांबण्यास सांगितले, तर पर्यटकांना तेथून जाण्यास सांगितले. कॅपिटॉल परिसरात पूर्वी येऊन गेलेल्या या व्यक्तीने हे कृत्य केल्याचे कॅपिटॉल पोलीस प्रमुख मॅथ्यू वेरडेरोसा यांनी सांगितले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा त्यांनी इन्कार केला. जेव्हा लोक येथे येतात तेव्हा त्यांची तपासणी केली जाते, ती प्रक्रिया योग्य पार पडली होती तरी स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३९ वाजता शस्त्रधारी व्यक्ती तेथे घुसली. काही मिनिटांतच त्याच्यावर गोळय़ा झाडण्यात आल्या व नंतर स्थानिक रुग्णालयात त्याला दाखल केले. नंतर कॅपिटॉल संकुल बंद करण्यात आले.