डेरा सच्चा सौदाचे गुरमित राम रहिम सिंग यांच्याविरोधातील बलात्काराच्या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. २५ ऑगस्टरोजी सीबीआयचे विशेष न्यायालय याप्रकरणात निर्णय देणार आहे. मात्र निकालाचा दिवस जवळ येत असतानाच पोलिसांची डोकेदुखीही वाढली आहे. डेरा सच्चा सौदाचे सुमारे ५० हजार समर्थक पंचकुलामध्ये पोहोचलेत.

डेरा सच्चा सौदाचे गुरमित राम रहिम सिंग यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात सीबीआयचे विशेष न्यायालय निकाल देणार आहे. शुक्रवारी निकाल येणार असला तरी या निकालाच्या पार्श्वभूमीवर पंचकुलामध्ये तणावपूर्ण परिस्थिती आहे. निकालाच्या तीन दिवसांपूर्वीच डेरा सच्चा सौदाचे सुमारे ५० हजार समर्थक पंचकुलामध्ये पोहोचलेत. निकाल गुरमीत राम रहिम सिंग यांच्याविरोधात गेल्यास त्यांचे समर्थक हिंसाचार घडवतील अशी भीती व्यक्त होत आहे. शहरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आवारात सुमारे ५०० पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. तर शहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. शहरातील आपातकालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

डेरा सच्चा सौदाचे समर्थक पेट्रोल बॉम्ब घेऊनच शहरात आल्याचा अहवाल पोलिसांच्या विशेष शाखेने दिला आहे. ड्रममधून डिझेल शहरात आणले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंचकुलाच्या दिशेने जाणाारे सर्व मार्ग बंद केले आहेत. पोलिसांना महामार्गावर गाड्यांना रोखले असले तरी समर्थक तिथून चालत पंचकुलात पोहोचत आहे. त्यामुळे त्यांना रोखायचे कसे असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे. पंचकुलामध्ये संवेदनशील भागात कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून न्यायालयाच्या दिशेने जाणारे पाचही रस्ते गुरुवारी आणि शुक्रवारी वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत.

चंदिगड पोलिसांनी सेक्टर १६ मधील क्रिकेट स्टेडियमचा वापर तुरुंग म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डेरा सच्चा सौदा समर्थकांना या स्टेडियममध्ये ठेवले जाईल. या स्टेडियममध्ये सुमारे १० हजार जणांना एक दिवसासाठी ठेवता येईल असे पोलिसांनी सांगितले. डेरा सच्चा सौदा समर्थक तलवार आणि अन्य शस्त्र जमवत असल्याची माहिती हरयाणामधील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.