रायन इंटरनॅशनल शाळेचे संस्थापक आणि संचालक ऑगस्टिने पिंटो आणि त्यांची पत्नी ग्रेस पिंटो यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या याचिकेवर उद्या हायकोर्टात सुनावणी होणार आहे. हायकोर्टाने दोघांना बुधवारपर्यंत अटक करता येणार नाही, असे निर्देश दिल्याने पिंटो दाम्पत्याला तात्पुरता दिलासा मिळाला होता. उद्या त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुडगावमधील रायन इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या प्रद्युम्न ठाकूर (८ वर्ष) या विद्यार्थ्याची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. बस कंडक्टर अशोक कुमारनेच त्याची हत्या केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अशोक कुमारला अटक केली आहे. तर शाळा व्यवस्थापनाविरोधातही कारवाईची चिन्हे आहेत. पालकांनीही शाळा व्यवस्थापनावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

हरयाणा पोलिसांचे पथक शाळेच्या संचालकांच्या चौकशीसाठी मुंबईत आले होते. या पार्श्वभूमीवर ‘रायन इंटरनॅशनल’चे संचालक ऑगस्टिनो पिंटो, त्यांची पत्नी ग्रेस आणि सीईओ रायन पिंटो यांनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. या अर्जावर हायकोर्टात आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पिंटो दाम्पत्याला तात्पुरता दिलासा दिला.

बुधवारी ‘रायन इंटरनॅशनल’चे फ्रान्सिस थॉमस यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी हरयाणाबाहेर घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. थॉमस आणि एका अधिकाऱ्याला पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. निष्काळजीपणासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. प्रद्युम्नची शाळेच्या आवारातच हत्या झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.