प्लेबॉय मासिकाची मॉडेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या कारेन मॅकडोगलने तिचं अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अफेअर होतं आणि त्यांनी किमान डझनवेळा सेक्स केलं होतं असा दावा केला आहे. ट्रम्प यांच्याशी 2006 मध्ये आपलं प्रेमप्रकरण सुरू झाल्याचं ती म्हणाली. ट्रम्प यांनीही प्रमेची अनेकवेळा कबुली दिल्याचं तिनं म्हटलंय. या अफेअरचा शेवट लग्नात होईल अशी अपेक्षा होती का यावर तिनं शक्य होतं, असं उत्तर दिलं. तर, रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार व्हाइट हाऊसनं डोनाल्ड ट्रम्प यांनी या मॅकडोगलबरोबर अफेअर असल्याच्या आरोपाचा इन्कार केल्याचं स्पष्ट केलं आहे.
मॅकडोगलच्या या बहुचर्चित अफेअरबद्दली तिनं दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे. न्यू यॉर्कर या मॅगेझिननं फेब्रुवारी महिन्यात वृत्त दिलं होतं की, ट्रम्प यांचं मॅकडोगल यांच्याशी अफेअर होतं, त्याचवेळी त्यांचे एका पॉर्नस्टारशीही अनैतिक संबंध होते. ट्रम्प यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून यासंबंधातील आरोप होत असून त्यांनी या सगळ्या अफवा असल्याचं सांगत खंडन केलं आहे.

सीएनएनशी बोलताना मॅकडोगलनं असंही सांगितलं, की आता या गोष्टी आता प्रत्येकजण बोलतोय, त्यामुळेच मी ही खुलेपणानं हे संबंध जगजाहीर करत आहे. कॅलिफोर्निया व न्यू जर्सी इथल्या गोल्फ कोर्सवर ट्रम्प यांच्याशी आपली ओळख झाल्याचं तिनं म्हटलंय.

लॉस एंजलिसमध्ये 2006च्या सुमारास आमचं अफेअर सुरू झालं आणि त्यानंतर डझनवेळा तरी आम्ही सेक्स केल्याचं तिनं सांगितलंय. विशेष म्हणजे याच सुमारास ट्रम्प यांच्या पत्नीनं बॅरन या मुलाला जन्म दिला होता. डोनाल्ड दिसायला चांगते होते आणि त्यांच्या करीश्मामुळे आपण प्रेमात पडल्याची कबुली तिनं दिली आहे. बेव्हर्ली हिल्समधल्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर ट्रम्पनी मला पैसे देऊ केले होते, परंतु मी त्या प्रकारातली मुलगी नसल्याचे सांगत पैसे घेण्यास नकार दिल्याचे मॅकडोगलनं या मुलाखतीत म्हटलं आहे.

नंतर न्यू यॉर्क शहरातल्या ट्रम्प टॉवरमधल्या त्यांच्या घरी मागच्या दारानं आपण गेल्याची आठवणही तिनं सांगितली. काही दिवसांपूर्वी स्टेफनी क्लिफोर्ड या स्टॉर्मी डॅनियल्स नावानं वावरणाऱ्या पॉर्न स्टारनंही आपलं ट्रम्प यांच्याशी अफेअर होतं असा दावा केला होता. ट्रम्प यांच्याशी असलेल्या संबंधाची वाच्यता न करण्यासाठी आपल्याला पैसे देण्यात आले होते असंही तिनं म्हटलं होतं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासारख्या अतिमहत्त्वाच्या पदावर असलेल्या डोनाल्ड ट्रम्पना त्यांच्या गतायुष्यातील या प्रकरणांमुळे व आरोपांमुळे राजकीय किंमत भोगायला लागण्याची शक्यता आहे का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.