पटेल समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर समाजातील आमदारांची भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी शुक्रवारपासून समाजाचा नेता हार्दिक पटेल आमदारांशी चर्चा करणार आहे.
पटेल समाजातील आमदारांशी शुक्रवारपासून चर्चेला सुरुवात करणार असून, त्यांना आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगणार आहोत.
पटेल समाजाचा समावेश अन्य मागासवर्गीयांमध्ये करण्यास ते अनुकूल आहेत की ते स्वपक्षाच्या भूमिकेशी ठाम आहेत, याची विचारणा करण्यात येणार आहे, असे हार्दिक पटेल याने सांगितले.
अहमदाबाद शहरातील बापूनगर परिसरात कोठडीत मरण पावलेल्या ३२ वर्षीय श्वेतांग पटेल याच्या शोकसभेसाठी येथे आला होता. प्रथम आपण आणि शेकडो समर्थक अहमदाबादमधील पटेल समाजाच्या आमदारांशी चर्चा करणार आहोत. त्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले जाणार आहे. सदर चर्चेचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे, असे हार्दिक पटेल म्हणाला.
गुजरात विधानसभेत पटेल समाजातील जवळपास ३५ आमदार आहेत.
सभेची परवानगी नाकारली
दरम्यान पटेल समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाची पुढील रूपरेषा आखण्यासाठी शहरातील एका मोकळ्या जागेवर जमलेल्या समाजातील २००हून अधिक नेत्यांना पोलिसांनी गुरुवारी सदर जागा सोडण्यास फर्मावले.
सदर नेत्यांनी परवानगीसाठी संपर्क साधण्यास विलंब केल्याने त्यांना बैठकीची परवानगी नाकारण्यात आली आणि जागा रिकामी करण्यास सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
हा आमच्या समाजाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सदर जागा सोडून जाताना एका नेत्याने केला. परवानगी मिळाली नाही तरी आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी दांडीपासून अहमदाबाद अशी उलटय़ा दिशेने दांडीयात्रा काढण्याचा निर्धारही नेत्याने व्यक्त केला.
पटेल समाजाच्या मुख्य संघटनेने म्हणजेच पाटीदार अनामत आंदोलन समितीने गुरुवारी दुपारी राधे फार्म येथे बैठक आयोजित केली होती. त्यापूर्वी पाटीदार समाज सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीसाठी समाजाचे नेते आमच्याकडे विलंबाने आले, अर्ज केल्यापासून केवळ दहा मिनिटांच्या कालावधीत आम्ही परवानगी देऊ शकत नाही, असे पोलीस सहआयुक्त हिमकरसिंह यांनी सांगितले. सध्याची स्थिती पाहता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्हाला पावले उचलावी लागली, असेही ते म्हणाले.