गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटीदार अनामत आंदोलन समिती आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांच्या कथित सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले. आपली बदनामी करण्यासाठीच भाजपने या सीडी प्रसिद्ध केल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला होता. त्यानंतर भाजपकडून आणखी ५२ सेक्स सीडीज प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची चर्चाही रंगली होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी हार्दिक पटेल यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. १९७०च्या दशकातील ‘रामचंद्र कह गये सिया से’ या प्रसिद्ध गाण्याच्या आधारे हार्दिक यांनी एक गाणे ट्विटरवर प्रसिद्ध केले आहे. या गाण्यात भाजपबरोबरच नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्यात आलेय. जे पत्नीला सांभाळू शकले नाहीत, ते दुसऱ्यांची सीडी बनवत आहेत, असा अप्रत्यक्ष टोला हार्दिक यांनी मोदींना लगावला.

भाजपला नाकीनाऊ आणलेल्या हार्दिकला ऐन निवडणुकीच्या तोंडावर घायाळ करण्याच्या हेतूने त्याच्या आक्षेपार्ह सीडी उघड करण्यात आल्या. अधिकृतरीत्या भाजपने तसे केले नसले तरी यामागे भाजपचाच डाव असल्याचा हार्दिकचा दावा आहे. या सीडीज उघड झाल्यानंतर हार्दिक ‘जेरबंद’ होण्याऐवजी अधिकच चवताळून उठल्याचे आणि त्याला युवा मतदारांची आणि मध्यमवर्गीयांची सहानुभूती मिळत असल्याचा ‘फीडबॅक’ भाजपला मिळतो आहे. ‘एकांतात केलेल्या आणि परस्परसंमतीने केलेल्या कृतीत गैर काय,’ असा सवाल विचारला जात आहे. त्याचबरोबर हार्दिकविरोधात भाजप एवढय़ा ‘खालच्या पातळी’वर उतरल्याने प्रभावशाली पटेल समाजातही त्याचे पडसाद उमटत आहे. अगदी त्याच्याविरोधात असलेल्या पटेल मंडळींचीही सहानुभूती त्याला मिळताना दिसते आहे. हार्दिकच्या ‘एकांताच्या अधिकारा’चे समर्थन करणारा ‘ट्रेण्ड’ही सामाजिक माध्यमांवर प्रभावी आहे. या सर्वाची दखल भाजपच्या अत्यंत वरिष्ठ पातळीवर घेण्यात आल्याचे समजते.

‘भाजपकडे आणखी ५२ सेक्स सीडीज; हार्दिक पटेलला बलात्कार प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न’

गुजरातच्या जनतेला २२ वर्षांच्या मुलाची नव्हे; तर २२ वर्षांत भाजपने केलेल्या विकासाची सीडी पाहायची आहे, असा टोमणा मारून हार्दिकने भाजपला आव्हानच दिलेय. ‘२३ वर्षांचा हार्दिक आता मोठा होतोय. मला बदनाम करण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले जात आहेत. पण मी लढणारा आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, मी मागे हटणार नाही,’ अशी आक्रमक भाषा त्याने वापरलेली आहे. विशेष म्हणजे, त्या सीडीमध्ये आपण नसल्याचा विश्वमित्री पवित्रा घेण्याऐवजी ‘मी मर्द आहे’ असे खुलेपणाने त्याने म्हटले आहे. हार्दिकच्या मदतीला दलित समाजाचा युवा नेता जिग्नेश मेवानी हा देखील धावून आला. ‘प्रिय हार्दिक, काळजी करू नकोस. मी तुझ्याबरोबर आहे. तुझ्या एकांताचा भंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही,’ असे जिग्नेशने सांगितले. ‘माझी सीडी आल्यास जरूर पाहा,’ अशीही टिप्पणी जिग्नेशने केली.

‘मोदी आहेत ना, मग गुजरात सुरक्षित’; भाजपचा नवा व्हिडिओ