हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरण देशातील महत्त्वाचा मुद्दा बनलं आहे. देशभरातून या प्रकरणावर संताप व्यक्त होत आहे. तर विरोधी पक्षांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. अशातच पीडितेच्या कुटुंबीयांवर प्रशासनाकडून इतरांना भेटण्यासाठी रोखलं जात असल्याचं वृत्त असून, याविषयी राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्विट करून निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हाथरस प्रकरणावरून पुन्हा एकदा उत्तर प्रदेश प्रशासनावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलणाऱ्या पीडितेच्या नातेवाईकाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “उत्तर प्रदेश प्रशासन सत्य लपवण्यासाठी क्ररतेवर उतरलं आहे. ना आम्हाला, ना माध्यमांना पीडितेच्या कुटुंबीयांशी भेट दिलं. त्याचबरोबर त्यांनाही बाहेर येऊ दिलं जात नाहीये. वरून पीडितेच्या कुटुंबीयांना मारहाण आणि असभ्य वर्तन केलं जात आहे. कोणताही भारतीय अशा वागणुकीचं समर्थन करू शकत नाही,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- “कोणालाही घाबरणार नाही; कोणत्याही अन्यायासमोर झुकणार नाही”

आणखी वाचा- “त्यांना अशी शिक्षा केली जाईल की…”; हाथरस प्रकरणानंतर योगी आदित्यनाथ यांची पहिली प्रतिक्रिया

गुरुवारी (१ ऑक्टोबर) दुपारी हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लाँग मार्च काढला होता. मात्र राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली होती. तर प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखल्याचा आरोप होतो आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लोकांनी गर्दी करण्यास मनाई करण्यात आलेली होती. तसंच सीमेवर बॅरिकेड्सही लावण्यात आले होते. तरीही काँग्रेस नेत्यांनी एपॅडेमिक अॅक्टचं उल्लंघन केलं. त्यामुळे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता.