देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने व्याजदरात कपात केली आहे. एचडीएफसी बँकेने व्याजदरात अर्ध्या टक्क्याची कपात केली आहे. त्यामुळे आता एचडीएफसीमध्ये बचत खाते असलेल्या ग्राहकांना ३.५ टक्के दराने व्याज मिळेल. खात्यात ५० लाखांहून कमी रक्कम असणाऱ्या सर्व ग्राहकांना हा व्याजदर लागू होईल. तर बचत खात्यात ५० लाखांहून अधिक रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी ४ टक्के इतका व्याजदर असेल.

एचडीएफसीने एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून नव्या व्याजदराची माहिती ग्राहकांना दिली. ‘बचत खात्यावरील व्याजदरांच्या पुनरावलोकनानंतर नवे दर ठरवण्यात आले आहेत. यानुसार जे ग्राहक त्यांच्या बचत खात्यात ५० लाखांपेक्षा कमी रक्कम ठेवतील, त्यांना ३.५ टक्के दराने व्याज मिळेल. तर ज्या ग्राहकांच्या बचत खात्यांमध्ये ५० लाखांहून अधिक रक्कम असेल, त्यांना ४ टक्के दराने व्याज देण्यात येईल. नवे व्याजदर १९ ऑगस्टपासून लागू करण्यात येतील,’ असे एचडीएफसीने म्हटले आहे.

याआधी देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने व्याजदरात कपात केली होती. बचत खात्यामध्ये १ कोटीपेक्षा कमी रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना ३.५ टक्क्याने व्याज देण्याचा निर्णय एसबीआयने काही दिवसांपूर्वीच घेतला. एसबीआयने व्याजदर ४ टक्क्यांवरुन ३.५ टक्क्यांवर आणल्यानंतर खासगी बँकांनीदेखील व्याजदरांमध्ये कपात केली. खासगी क्षेत्रातील एक मोठी बँक असलेल्या अॅक्सिस बँकेने बचत खात्यांसाठीचा व्याजदर अर्ध्या टक्क्याने कमी केला. यानंतर बँक ऑफ बडोदाकडूनही व्याजदरात कपात करण्यात आली.

एचडीएफसी, अॅक्सिस बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात अर्ध्या टक्क्याची घट केल्यावर यस बँकेनेदेखील व्याजदरात कपात केली आहे. यस बँकेने बचत खात्यावरील व्याजदर एका टक्क्याने कमी केला आहे. त्यामुळे यस बँकेतील बचत खात्यात १ लाखाहून कमी रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना ५ टक्के व्याज मिळेल. तर खात्यात १ लाखाहून अधिक रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना ६ टक्के व्याज मिळेल. याशिवाय खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम ठेवणाऱ्या ग्राहकांना ६.५ टक्क्यांऐवजी ६.२५ टक्के व्याज मिळेल. यस बँकेचे नवे व्याजदर १ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.