कोणत्याही व्यक्तीकडील काळा पैसा अगदी सहजपणे पांढरा करून देण्याचा गोरखधंदा देशातील तीन नामांकित खासगी बॅंका करीत असल्याचा आरोप ‘कोब्रा पोस्ट’ने एका स्टिंग ऑपरेशनच्या साह्याने केला आहे. खासगी क्षेत्रातील अग्रगण्य आयसीआयसीआय बॅंक, एचडीएफसी बॅंक आणि अ‍ॅक्सिस बॅंक हा गैरव्यवहार करीत असल्याचा आरोप करण्यात आलाय. ‘ऑपरेशन रेड स्पायडर’ असे या स्टिंग ऑपरेशनला नाव देण्यात आले आहे.
कोब्रा पोस्टच्या वार्ताहरांनी या तिन्ही बॅंकांच्या देशातील विविध शाखांमध्ये जाऊन हे स्टिंग ऑपरेशन केले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याबाबत तपास करण्यात येत असून, त्यात बॅंकांमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचे रॅकेट पद्धतशीरपणे राबविले जात असल्याचा दावा करण्यात आलाय. स्टिंग ऑपरेशनचे व्हिडिओ कोब्रा पोस्टच्या वेबसाईटवर ठेवण्यात आले आहेत.
बॅंकेच्या माध्यमातून पैशांचा गैरव्यवहार किंवा अपहार होऊ नये, म्हणून रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने घालून दिलेली चौकट या बॅंकांकडून पद्धतशीरपणे मोडीत काढली जाते. प्राप्तिकर कायदा आणि ‘फेमा’चेही उल्लंघन बॅंकांकडून करण्यात येते, असे कोब्रा पोस्टने म्हटले आहे. गैरव्यवहारामुळे या बॅंकांकडील ठेवी आणि त्यांच्या नफ्यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोप कोब्रा पोस्टने केलाय. कोब्रा पोस्टने केलेल्या आरोपांची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येईल, असा खुलासा आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बॅंकेने निवेदनाद्वारे केलाय.  
या स्टिंग ऑपरेशनमध्ये आढळलेले काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष पुढीलप्रमाणे…

बॅंकाच्या शाखेमध्ये येणारा कोणताही सामान्य ग्राहक त्याच्याकडील काळा पैसा बॅंकेच्या माध्यमातून पांढरा करून घेऊ शकतो. ही एकप्रकारे बॅंकांकडून केली जाणारी पैशांची अफरातफर आहे.

काळा पैसा पांढरा करण्यासाठी ग्राहकांना विविध स्वरुपाचे पर्याय या तिन्ही बॅंकांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत

देशातील कोणत्याही शाखेमध्ये एकाच पद्धतीने हा संपूर्ण गैरव्यवहार केला जातो. काळा पैसा पांढरा करण्याची पद्धती सर्व ठिकाणी सारखीच आहे. काळा पैसा पांढरा करण्याचे हे एक रॅकेटच आहे.