दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गाजियाबादला पावसाचा खूप मोठा फटका बसला असून वसुंधरा येथे रस्ता खचल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीये. नोएडा, गाजियाबाद आणि गुडगाव येथे रस्त्यांवर पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान पावसाचा परिणाम विमान आणि रेल्वेसेवेवर झाला असल्याची कोणतीही माहिती मिळालेली नाही. हवामान खात्याने दिल्ली-एनसीआरमध्ये तुफान पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. उत्तर भारतात पुढील पाच दिवस पाऊस पडत राहील असा अंदाज आहे. हवामानात कोणताही बदल होणार नसल्याचं हवामान खात्याने सांगितलं आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर पश्चिम भारतातही पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.