सौराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत झाली आहे. मात्र अनेक भागांमध्ये वाहतूक विस्कळीत झाली असून काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. सोमवारी रात्रीपासून सुमारे २८२ गावांचा वीजपुरवठा मुसळधार पावसामुळे खंडित झाला. पोरबंदर जिल्ह्य़ातील कुटियाना येथे गेल्या २४ तासांत सर्वाधिक म्हणजे २७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याखेरीज, राजकोट जिल्ह्य़ातील पाटणवाव येथे २२५ मिलीमीटर पाऊस पडला.  जुनागढ जिल्ह्य़ात १२५ मिलीमीटर आणि राजकोट शहरात १२० मिलीमीटर पाऊस पडला. जामनगर येथे ५० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या परिसरातील अनेक धरणे आणि तलावांमध्ये आठ फूट पाणी भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशातही मुसळधार
उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि पूर्व भागात गेल्या २४ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडल्यामुळे त्या भागांतील तापमानात लक्षणीय घट झाली. मोरादाबाद विभागातील दोन क्षेत्रांमध्ये मोठा पाऊस पडल्याची माहिती वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली. मोरादाबाद विभागाच्या ठाकूरवाडा परिसरात २६ सेमी तर ललीतपूर, नगिना व बरेली येथे १५ सेमी पावसाची नोंद झाली.
पंजाब हरयाणातही पाऊस
पंजाब व हरयाणाच्या अनेक भागांतही मंगळवारी मोठय़ा प्रमाणावर पाऊस पडल्यामुळे दिवसाचे तापमान मोठय़ा प्रमाणावर घसरले. चंदीगढ येथे पावसाच्या सरी कोसळल्यानंतर काही काळ धुळीचे वादळ निर्माण झाले. शहरातील तापमान ३३.३ अंश सेल्सियस नोंदविण्यात आल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.