मुंबई व कोकणाला मान्सूनच्या पावसाने झोडपून काढले असून येते दोन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
‘स्कायमेट’ या खासगी हवामान अंदाज कंपनीने सांगितले, की गुजरातचा दक्षिण किनारा ते केरळ या भागात पाऊस आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण व गोव्यात येत्या ७२ तासांत काही ठिकाणी पाऊस होईल, उद्यापासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. येत्या २४ तासांत मराठवाडय़ात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीत १०४ मि.मी., गोव्यात १०१ मि.मी., कर्नाटकातील होनावर व केरळमधील कोची येथे ५१ व ४६ मि.मी. पाऊस झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर जास्त पाऊस आहे. मछलीपटनम येथे २४ तासांत ७० मि.मी. पाऊस झाला आहे.
बंगालच्या उपसागरातील स्थितीमुळे दक्षिण ओडिशात जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्र, विदर्भ, छत्तीसगड येथे येत्या २४ तासांत काही ठिकाणी पावसाची शक्यता
आहे.