माकडांच्या उच्छादाचा मुद्दा खासदार हेमा मालिनी यांनी लोकसभेतील चर्चे दरम्यान मांडला. मथुरा या लोकसभा मतदारसंघातून  हेमा मालिनी यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि त्या खासदारही झाल्या. याच मतदारसंघातील माकडं किती उच्छाद मांडतात हे हेमा मालिनी यांनी आज लोकसभेत सांगितलं. हा कोणताही चेष्टेचा विषय नाही तर गंभीर विषय आहे असंही त्या म्हणाल्या. मथुरा, वृंदावन या भागांमधील मंदिरांमध्ये माकडांचा उच्छाद असतो. लोकांना तो सहन करावा लागतो असं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

“वृंदावनमध्ये देश-विदेशातून अनेक पर्यटक येतात. ते या परिसरात असलेल्या माकडांना ज्यूस देतात, खायला घालतात. या गोष्टींमुळे माकडांची प्रकृती बिघडते आणि आपल्याला काय झालं आहे हे न समजल्याने ही माकडं आक्रमक होतात. त्यानंतर ते लोकांना चावतात. अशा काही घटनाही घडल्या आहेत ज्यामध्ये माकड चावल्याने पर्यटकांचा मृत्यू झाला” ही बाबही लोकसभेतल्या चर्चेत हेमा मालिनी यांनी निदर्शनास आणली.

हेमा मालिनी यांच्या प्रमाणेच तृणमूलचे खासदार सुदीप बंदोपाध्याय यांनीही हेमा मालिनी यांनी मांडलेला मुद्दा रास्त असल्याचं म्हटलं आहे. एवढंच नाही तर देशातल्या अनेक मंदिरांमध्ये माकडांचा उच्छाद पाहण्यास मिळतो असंही बंदोपाध्याय यांनी सांगितलं. तसेच या संबंधी उपाय योजण्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.

बंदोपाध्याय यांच्याप्रमाणेच लोजपाचे खासदार चिराग पासवान यांनीही दिल्लीतल्या माकडांचा मुद्दा चर्चेत पुढे आणला. दिल्लीत ज्या भागांमध्ये खासदारांचे आणि मंत्र्यांचे बंगले आहेत तिथेही काही भागांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला आहे ही बाब त्यांनी सभागृहापुढे सांगितली. एवढंच नाही मी ज्या घरात राहतो त्या आवारातही माकडांचा वावर असतो मला त्यांची भीती वाटते असेही चिराग पासवान यांनी सांगितले. तसेच या समस्येवर लवकरात लवकर उपाय योजले गेले पाहिजेत अशीही मागणी त्यांनी केली.