नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि वस्तू आणि सेवाकर विधेयकाचा (जीएसटी) सुतराम संबंध नाही, विधेयकातील मतभेदांचे तीन मुद्दे सोडविल्यास काँग्रेसचा करसुधारणांना पाठिंबाच राहील, असे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे स्पष्ट केले.

नॅशनल हेराल्ड आणि वस्तू आणि सेवाकर विधेयकाचा काही माध्यमांनी संबंध जोडला, मात्र या दोघांचा सुतराम संबंध नाही, हे दोन्ही प्रश्न निराळे आहेत, असेही राहुल गांधी यांनी येथे ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार यांच्याशी बातचीत करताना स्पष्ट केले.
दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर बजाविण्यात आलेले समन्स रद्द करण्यास नकार दिला. त्यानंतर काँग्रेसने हा राजकीय सूड असल्याचे मत व्यक्त करून संसदेचे कामकाज रोखले. त्यामुळे वस्तू आणि सेवा कर विधेयकाला विलंब झाला.
काँग्रेसने वस्तू आणि सेवा कर विधेयक आणले होते तेव्हा मोदी आणि जेटली यांनी त्याला विरोध करून नावे ठेवली होती, मात्र आम्ही हे विधेयक आणण्यास अनुकूल आहोत, त्यामुळे लाल फितीचा कारभार संपुष्टात येईल, असे राहुल गांधी म्हणाले. या विधेयकातील काही मुद्दय़ांना काँग्रेसचा विरोध आहे.

काँग्रेसला नोटीस देण्याचे संकेत- सिब्बल
नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस पक्षाला प्राप्तिकर खात्याची नोटीस दिली जाण्याचे संकेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्या फेसबुक व ब्लॉग लिखाणातून अप्रत्यक्षपणे दिले आहेत, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी फसवणूक केल्याचे व काँग्रेसने पैसा हडप केल्याचे सगळे आरोप त्यांनी फेटाळले आहेत.नॅशनल हेराल्ड प्रकरण हा प्राप्तिकर कायद्यानुसार गुन्हा आहे असे अर्थमंत्री त्यांच्या फेसबुक व ब्लॉगवर म्हणतात, त्यांना अशी विधाने करण्याचा अधिकार आहे का. यातून ते प्राप्तिकर खात्याने काँग्रेस पक्षाला नोटीस जारी करावी असेच सुचवत आहेत. किंबहुना त्यासाठी ते फूस देत आहेत असा आरोप केला.