अहमदाबाद येथे उत्तर प्रदेशतील आग्रा येथून आलेले २४ हिंदू आणि मुसलमान कारागीर दसऱ्यानिमित्त रावणाचे पुतळे तयार करण्यात मग्न असलेले पाहायला मिळतात. हे सर्वजण ‘खानवाडी मुस्लिम वस्ती’ या मुस्लिम बहुल परिसरात गेल्या चाळीस दिवसांपासून रावण, मेघनाथ आणि कुंभकर्णाचे विशाल पुतळे तयार करण्याचे काम करत आहेत. येथे ते काही काळासाठी आले असून, पुतळे बनविण्यासाठी त्यांच्याकडे संपूर्ण राज्यातून मागणी आहे. अहमदाबादच्या जवळ असलेले हरे कृष्ण मंदिरदेखील त्यांच्याकडून दरवर्षी पुतळे तयार करून घेते. ३८ वर्षीय शराफत अली खान यांना त्यांच्या वडिलांकडून ही कला प्राप्त झाली असून, सर्व सहकाऱ्यांवर त्यांची बारीक नजर असते.
प्रत्येकाचे काम हे वाटून देण्यात आलेले आहे. कोणी पुतळ्याला बांबू लावण्याचे काम करतो, तर कोणी पुतळ्याच्या मागणीप्रमाणे रंगीत कागदाने पुतळा सजवण्याचे काम पाहतो. इथे ५ फूट आणि २५ फूटांपासून ५० फूटांपर्यंतचे पुतळे तयार करण्यात येतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोणत्याही पुतळ्याला शिर लावण्यात आलेले नाही. एवढे भव्य पुतळे ग्राहकापर्यंत पोहोचविणे जिकरीचे असल्याने पुतळ्याचे डोके नंतर पोहोचविण्यात येत असल्याचे शराफत अली खान यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांमध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या पावसामुळे शराफत अली खान आणि त्यांचे सहकारी काहीसे निराश झाले होते. एवढे मोठे पुतळे सुरक्षितपणे ठेवण्यासाठी त्यांच्याकडे अपेक्षित जागा नाही. अनेक पुतळ्यांवर पुन्हा काम करायला लागले. दिवसरात्र सतत काम करून पुतळ्यांचे काम पूर्ण केल्याची माहिती मोमिन खान नावाच्या सदस्याने दिली. आमच्याकडे मुंद्रा, द्वारका, मोडसा, नाडियाड, वडोदरा आणि अहमदाबाद येथून पुतळ्यांसाठी मागणी आहे. ओडिशाच्या राउरकेला आणि राजस्थानच्या जोधपूरमधूनदेखील मागणी आहे. माझ्या वडिलांनी जवळजवळ ५० वर्षांपूर्वी पहिल्यांदा रावणाचा पुतळा तयार केला. १५ वर्षांचा असल्यापासून मीदेखील हे काम करत असल्याचे मोमिन खान यांनी सांगितले.
जीतूभाई नावाचे एक सदस्य गेल्या १० वर्षांपासून शराफत अली खान यांच्यासोबत काम करत आहेत. ते सांगतात की, आमचा २४ जणांचा चमू असून यात १२ जण हिंदू आणि अन्य मुसलमान आहेत. आम्ही एकाच ठिकाणी राहतो, खातो-पितो आणि काम करतो. स्वयंपाकसुध्दा एकाच ठिकाणी बनवतो. पूजा आणि प्रार्थना एकाच ठिकाणी करतो. इथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसल्याचं जीतूभाई सांगतात. शराफत आली खान यांची आई आणि त्यांचा मुलगादेखील त्यांना या कामात मदत करतात. मुसलमान सणांपेक्षा दसरा सणाशी आपली जास्त जवळीक असल्याचं शराफत सांगतात. त्याचबरोबर आपण दुसऱ्या कोणत्याही कामाचा विचारदेखील करू शकत नसल्याचे ते म्हणतात. मी आपल्या नावाने नव्हे तर कामाने ओळखली गेली पाहिजे असे सांगत, शराफत यांच्या ६८ वर्षाच्या आईने नाव सांगण्यास नकार दिला. माझे चारही मुलगे दसऱ्यासाठी पुतळे तयार करतात. हीच आमची ओळख असून, हेच आमचे जीवन आहे, असे देखील त्या म्हणाल्या.
आग्रा आणि मथुरेतून आलेल्या या कारागिरांना आपले कुटुंब सोडून इथे यावे लागते. आग्रा येथून आलेले बादशाह खान सांगतात की, आमची मुले छोटी असून, ती शाळेत जात असल्या करणाने आम्ही त्यांना आमच्याबरोबर आणू शकत नाही. एम.कॉम झालेला बादशाह खान यांचा मोठा मुलगा नोकरी करतो. बादशाह खानला मुलांच्या भविष्याबाबत विचारले असता ते म्हणतात, मला चार मुलगे असून ते आमची परंपरा सांभाळतील अथवा नाही हे आत्ताच सांगणे घाई केल्यासारखे होईल. परंतु ही परंपरा अनंत काळ चालेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.