अमेरिकेचे ४५ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी पदभार स्विकारला तेव्हा ‘ओव्हल ऑफिस’च्या परंपरेचे पालन करताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यासाठी एक खासगी पत्र लिहिले होते. या पत्राचा अधिकृत ताबा ‘सीएनएन’ या माध्यम समूहाला मिळाला असून त्यांनी ते सार्वजनिक केले आहे. या पत्रात ओबामांनी ट्रम्प यांना अमेरिकेन लोकशाही जपण्याचे आवाहन केले आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय असणारे ‘ओव्हल ऑफिस’ सोडताना ओबामा यांनी आपल्या ‘रिसॉल्यूट डेस्क’च्या अगदी वरच्या ड्रॉवरमध्ये ट्रम्प यांच्यासाठी हे पत्र ठेवले होते. या पत्राबद्दल ट्रम्प यांनी मधल्या काळात भाष्यही केले होते. पत्रकारांना या पत्राचा ताबा कधीही मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता ‘सीएनएन’ माध्यमसमूहाला या पत्राचा ताबा मिळाला असून त्यांनी हे पत्र पहिल्यांदाच सार्वजनिक केले आहे.

या पत्राची सध्या चर्चा सुरु असली तरी त्यावेळी ओबामा यांनी म्हटले होते की, “हे पत्र म्हणजे ट्रम्प यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचा सल्ला नाही. मात्र, त्यामुळे ट्रम्प यांना फायदाच होऊ शकेल. माझ्या कारकिर्दीतल्या गेल्या ८ वर्षांतील कामाचे प्रतिबिंब यात आहे. कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या प्रत्येकासाठी आपण काम करायला हवे. अमेरिकेचे नेतृत्व हे जगाला नाकारता येणार नाही. मात्र, त्यासाठी अमेरिकेने आपल्या कृतीतून आदर्श घालून द्यायला हवा, अशी अपेक्षाही ओबामा यांनी या पत्रात व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेची लोकशाही संस्था आणि परंपरा, कायद्याचे राज्य, सत्तेचे विकेंद्रीकरण, सर्वांसाठी सुरक्षा आणि नागरी स्वातंत्र्य राखणे हे महत्वाचे असल्याचे ओबामा यांनी पत्रात म्हटले आहे.