नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा निर्णयम् हा  ऐतिहासिक असून त्यामुळे पश्चिमी शेजारी देशाकडून पुकारण्यात आलेल्या छुप्या युद्धाला आळा बसला आहे, असे लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी ७२ व्या सेनादिनानिम्मित करियप्पा संचलन मैदानावर आयोजित कार्यक्रमात मंगळवारी सांगितले.

अनुच्छेद ३७० रद्द केल्याने जम्मू काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यास मदतच होईल, असे सांगून ते म्हणाले, की लष्कर दहशतवादाची कुठलीही कृत्ये सहन करणार नाही. जे दहशतवादी कारवाया करतात त्यांच्या विरोधात कारवाईसाठी आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. नरवणे यांचा सगळा रोख पाकिस्तानवर होता.

दहशतवादाच्या कारवाया करून कुणी आगळीक केली तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल, तसेच त्यासाठी विविध पर्याय वापरले जातील, असे सांगून ते म्हणाले की, दहशतवादाचा ठोसपणे मुकाबला केला जाईल. गेल्या वर्षी देशाला काही आव्हानांना तोंड द्यावे लागले होते. त्यात  नियंत्रण रेषा व प्रत्यक्ष ताबा रेषेवर आम्ही सतर्कता बाळगून कारवाई केली. उत्तर सीमेवरील (चीन) परिस्थिती तुलनेने शांततामय आहे. जम्मू काश्मीरमधील स्थिती ही प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थितीशी निगडित असते. देशासाठी प्राणाचे बलिदान देणाऱ्या सैनिकांचे आज आम्ही स्मरण करतो. त्यातून आगामी अनेक पिढय़ांना प्रेरणा मिळत राहील. सियाचीन भेटीबाबत ते म्हणाले,की लष्कराच्या सर्व पातळ्यांवर आत्मविश्वास दिसत आहे. गेल्या काही दिवसात हिमस्खलनाने काही लष्करी जवान प्राणास मुकले. आम्ही त्यांचे बलिदान स्मरणात ठेवू.

या वेळी ‘धनुष’ व ‘के- वज्र’ या तोफा प्रणालीचे प्रदर्शन लष्कराच्या संचलनात पहिल्यांदाच करण्यात आले.

दिल्ली कॅन्टोन्मेंट भागातील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात जवानांना सेनापदके प्रदान करण्यात आली. सर्व पुरुष जवानांचा समावेश असलेल्या संचलनाचे नेतृत्व चौथी पिढी लष्करात असलेल्या तानिया शेरगिल या लष्कराच्या कॅप्टन महिलेने केले.

संरक्षण प्रमुख बिपीन रावत, लष्करप्रमुख नरवणे, हवाई दल प्रमुख आरकेएस भादुरिया व नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकास भेट देऊ न आदरांजली वाहिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेना दिनानिमित्त लष्कराला शुभेच्छा दिल्या आहेत.