देशात करोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात करोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट दिसून येत आहे. मात्र, मृत्यू्चे प्रमाण अद्याप चिंतेचा विषय आहे. भारतात, गेल्या २४ तासात करोना संक्रमणामुळे ४३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेल्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. आज (मंगळवार) आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात करोनाचे २,६३,५३३ नवीन रुग्ण आढळले आहेत.

देशात गेल्या २४ तासात २,६३,५३३ नवीन करोना रुग्ण आढळले. तर ४,२२,४३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४,३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात आतापर्यंत २,५२,२८,९९६ करोना केसेस आढळले आहेत. तर २,१५,९६,५१२ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे. २,७८,७१९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात ३३,५३,७६५ बाधित करोना रुग्ण आहेत.

करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं

करोनावरील उपचारांमध्ये महत्वाची मानल्या जाणाऱ्या प्लाझ्मा थेरपीसंदर्भात केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही काळापासून करोना रुग्णांवर उपचारपद्धती म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात होता. दरम्यान केंद्र सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या टास्क फोर्सने करोनाच्या प्रौढ रुग्णांवरील उपचारातून प्लाझ्मा थेरपीला वगळलं आहे. यासंबंधी टास्क फोर्सकडून नव्याने मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहेत.

आतापर्यंत करोनासंबंधी उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी होती. केवळ सुरुवातीच्या टप्यात म्हणजेच लक्षणं दिसल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जाऊ शकत होता. दरम्यान टास्क फोर्सने आता प्लाझ्मा थेरपीला उपचारांमधून वगळलं आहे.