जगभरात थैमान घालत असलेल्या करोनाचा प्रादुर्भाव देशात झपाट्याने वाढत आहे. देशात आतापर्यंतची एका दिवसातील करोना रुग्ण संख्येतील सर्वाधिक वाढ नोंदवल्या गेली आहे. मागील चोवीस तासात तब्बल ३८ हजार ९०२ नवे करोनाबाधित आढळले असून, ५४३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १० लाख ७७ हजार ६१८ वर पोहचली आहे.

सद्यस्थितीस देशात ३ लाख ७३ हजार ३७९ जणांवर उपचार सुरू आहेत. तर ६ लाख ७७ हजार ४२३ जणांना करोनावर मात केलेली आहे. आतापर्यंत देशभरात करोनामुळे २६ हजार ८१६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.

देशात १८ जुलैपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमीवर १ कोटी ३७ लाख ९१ हजार ८६९ नमूण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यातील ३ लाख ५८ हजार १२७ नमूने काल तपासण्यात आले आहेत.

करोना  महामारीचा विळाखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. जगात दररोज लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगात आतापर्यंत एक कोटी ४४ लाख २५ हजार ८६५ करोनाबाधित रुग्ण झाले आहेत. तर करोना बळींची संख्या सहा लाख चार हजार ९१७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ८६ लाख १२ हजार जणांनी करोनावर मात केली आहे. ५२ लाख रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अमेरिका, ब्राझील आणि भारताला करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अमेरिकेत आतापर्यंत ३८ लाख ३३ हजार २७१ जणांना करोना झाला आहे. यापैकी एक लाख ४२ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची परिस्थिती सर्वात भयानक आहे. अमेरिकासारख्या देशात करोना विषाणूमुळे झालेल्या नुकासानामुळे अनेक देशात भितीचं वातावरण आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये दररोज ५० हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळत आहेत.ब्राझीलमध्येही करोनाची भयावह परिस्थिती असून आतापर्यंत २० लाख ७५ हजार जणांना करोना झाला आहे. तर ७८ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलपाठोपाठ भारताला करोनाचा विळाखा बसला आहे.