वजन २१०० किलो; १५ किलोमीटपर्यंत ध्वनी

जलेसर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील इटाह जिल्ह्य़ात जलेसर येथील  मित्तल बंधूंच्या घंटा कारखान्याला अयोध्येतील राम मंदिरासाठी २१०० किलो वजनाची पितळेची घंटा बनवण्याचे काम मिळाले आहे. तेथील हिंदू मुस्लीम कलाकार आता ही घंटा बनवण्याच्या कामात गुंतले आहेत.

गेली तीस वर्षे या कारखान्यातील कलाकार दाऊ दयाल हे वेगवेगळ्या आकाराच्या घंटा बनवत आहेत. राम मंदिराच्या  घंटेची रचना मुस्लीम कलाकार इक्बाल मिस्त्री यांनी केली असून ते घंटा बनवण्यात निष्णात आहेत. राम मंदिरातील घंटेचा आवाज १५ कि. मी. अंतरापर्यंत ऐकू जाणार आहे.

दयाल व मिस्त्री  यांनी सांगितले की, प्रथमच इतक्या मोठय़ा वजनाची घंटा आम्ही तयार करीत आहोत. ही काही महिन्यांची प्रक्रिया आहे. त्यात थोडीशीही चूक चालणार नाही. राम मंदिराची घंटा बनवण्याचे भाग्य लाभल्याने आम्ही आनंदात आहोत. घंटा बनवताना जर धातू साच्यात ओतताना पाच सेकंदाचा विलंब झाला तरी सगळे गणित चुकते. वरून खालपर्यंत अखंड अशी घंटा तयार करायची आहे, त्यात तुकडे चालणार नाहीत. त्यामुळेच हे काम अवघड आहे. ही घंटा केवळ पितळेची नसून त्यात अष्टधातू आहेत. त्यात सोने, चांदी, तांबे, जस्त, शिसे, लोह, कथील व पारा असेल.

जलेसर पालिकेचे अध्यक्ष विकास मित्तल यांनी सांगितले की, इटाह जिल्ह्य़ात जलेसर येथे  आम्ही ही घंटा  राम मंदिरास भेट म्हणून देणार आहोत. त्यांना निर्मोही आखाडय़ाकडून २१०० किलोची घंटा बनवण्याची ऑर्डर मिळाली आहे. या घंटेसाठी २१ लाख रुपये खर्च येणार आहे, पण मंदिरासाठी ती देणगी म्हणून दिली जाणार आहे.

हिंदू व मुस्लीम मिळून २५ कारागीर मित्तल यांच्याकडे काम करतात. त्यातील दयाल यांनी केदारनाथ मंदिराची १०१ किलोची घंटा तयार केली आहे. उज्जनच्या महाकालेश्वर मंदिराची १ हजार किलोची घंटा त्यांनीच केली असून मित्तल बंधूंनी इटाह येथील भेटीत मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना ५१ किलोची घंटा भेट दिली होती. जलेसरमध्ये पितळ सापडते.