केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह सोमवारी(दि.12) उत्तर प्रदेशच्या मुरादाबाद येथे लोकसभेच्या पाच जागांसाठी आयोजित केलेल्या ‘शक्ती संमेलनात सहभागी झाले होते. गृहमंत्र्यांचं स्वागत करताना मुरादाबादचे खासदार सर्वेश सिंह यांनी त्यांना सोन्याचा मुकुट देण्याचा प्रयत्न केला, मात्र विनम्रपणे राजनाथ सिंह यांनी तो मुकुट स्वीकारण्यास नकार दिला आणि मतदार क्षेत्रातील एखाद्या गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नामध्ये हा मुकुट द्या असा सल्ला दिला.

सोन्याचं मुकुट नाकारुन आणि त्यासोबत दिलेल्या बहुमोल सल्ल्याने राजनाथ सिंह यांनी उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि नेत्यांची मनं जिंकली. या प्रकारानंतर कार्यक्रमस्थळी बराच वेळ टाळ्यांचा कडकडाट झाला. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, यावेळी खासदार सर्वेश सिंह यांनी राजनाथ सिंहांनी दिलेला सल्ला नव्हे तर तो आदेश असल्याप्रमाणे यापुढे काम करु असं म्हटलं. तसंच गरीब कुटुंबातील मुलीच्या लग्नात सोन्याव्यतिरिक्त अन्य काही कमतरता तर नाही ना याचीही काळजी घेऊ असं म्हटलं.

योगी सरकारचं कौतुक –
यावेळी बोलताना सिंह यांनी उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारला 100 गुण दिले. योगींमुळे गुन्हेगार घाबरले आहेत, ते उत्तर प्रदेशमधून पळ काढतायेत, राज्यातील गुन्हेगारी कमी झाली आहे. योगींवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाहीये, हीच भाजपाजची संस्कृती आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.